सातारा - निझामुद्दीन येथे मरकजसाठी गेलेल्या साताऱ्यातील 38 लोकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली. या सर्वांना १४ दिवस संस्थात्मक अलगीकरणासाठी ठेवले आहे. त्यानंतरही त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना होम क्वारन्टाईनसाठी घरी सोडण्यात येईल, असे ते म्हणाले.
दिल्ली निजामुद्दीन येथे जाऊन आलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचा मुद्दा देशभर चर्चेत आहे. जिल्ह्यातील 38 लोक मरकजच्या यादीत होते. त्या लोकांना शोधून त्यांना ट्रॅक करण्यात आले. त्यांची तपासणी करण्यात आली. हे सर्व लोकांचा वैद्यकीय अहवाल 'निगेटिव्ह' आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासात असलेल्या 16 नागरिकांना आणि श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे आणखी एकाला आज विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. तसेच कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये अशा 48 नागरिकांना आणि 3 महिलांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.