सातारा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्वानिमित्त माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने कराड शहरातून भव्य तिरंगा पदयात्रा काढून, तर माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने सायंकाळी मशाल रॅली काढून स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले. तिरंगी झेंडे, शंभर फुटी तिरंगा ध्वज, ढोल-ताशे आणि स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या चित्ररथांमुळे कराड शहर तिरंगामय झाले होते.
काँग्रेसच्या पदयात्रेने कराड बनले तिरंगामय भेदा चौकातून तिरंगा पदयात्रेला सुरूवात झाली. तहसीलदार कचेरी, शाहू चौकातून पदयात्रा दत्त चौकात आली. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण हे पदयात्रेत सहभागी झाले. यावेळी दत्त चौक गर्दीने फुलून गेला होता. स्वातंत्र्याचा जयघोष करत पदयात्रा मुख्य बाजारपेठ मार्गाने पुढे गेली. रस्त्याच्या दुतर्फा नागरीकांची गर्दी होती. आझाद चौकातील मंडपात भोईराज समाज मंडळाने स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमांची गॅलरी उभारली होती. त्याठिकाणी पृथ्वीराज चव्हाण, अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी अभिवादन केले. पदयात्रेमुळे संपुर्ण कराड तिरंगामय झाले होते.
क्रांतिकारकांमुळेच स्वातंत्र्याची पहाट आझाद चौकातून तिरंगा पदयात्रा चावडी चौकमार्गे कन्या शाळा आणि तेथून नगरपालिका चौकाकडे आली. त्याठिकाणी पदयात्रेचे सभेत रूपांतर झाले. 1857 च्या उठावापासून ते 1947 पर्यंतच्या लढ्यात योगदान देणार्या क्रांतिवीरांच्या योगदानाचा पृथ्वीराज चव्हाण यांनी गौरव केला. स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारकांच्या त्यागाचे स्मरण करून पुर्वजांचा ज्वाजल्य इतिहास आजच्या पिढीसमोर आला पाहिजे. त्यांच्या योगदानातूनच स्वातंत्र्याची पहाट उगवली आहे. हे कदापि विसरता येणार नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी पदयात्रेला संबोधित करताना सांगितले.
आझाद चौकात स्वातंत्र्य सेनानींना अभिवादन स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास असणार्या कराडमधील आझाद चौकात दिवंगत स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात आले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भोई समाजातील अनेक स्वातंत्र्यसैनिक चले जाव चळवळीत सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, क्रांतिसिंह नाना पाटील, बाबुराव कोतवाल, सम्राट जिरंगे, यशवंत मुळे, गणपतराव चव्हाण, राजाराम जिरंगे, सखाराम चक्के, आकारात वंजारी, पा़डुरंग पाडळे, अब्दुल हमीद वाईकर, गणपती वंजारी, निवृत्ती मुळे, राजाराम शिंदे, यशवंत सातुरे, रामचंद्र मुळे, अनंतराव मुळे या स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमांचे आझाद चौकात पूजन करण्यात आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, माजी उपनगराध्यक्ष सुभाषराव पाटील, राजेंद्रसिंह यादव, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह कराडकरांनी या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले.
क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ राष्ट्रवादीची मशाल रॅली स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीने दत्त चौक ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत मशाल रॅली काढून अभिवादन केले. स्वातंत्र्य चळवळीत क्रांतिकारकांनी दिलेले योगदान कदापि विसरता येणार नाही. त्यांच्या त्याग आणि बलिदानामुळेच स्वातंत्र्य चळवळ यशस्वी झाली. चळवळीच्या अखेरच्या टप्प्यात सातारा जिल्ह्याचे मोठे योगदान होते. क्रांतिकारकांच्या त्यागाच्या स्मरणार्थ ही मशाल रॅली काढण्यात आल्याचे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.