सातारा- कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच जिल्ह्यातही दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे, जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र, फलटणमधील एका गावात परदेशातून आलेल्या एका व्यक्तीचे विलगीकरण करण्यात आले असतानाही त्याने सतत घराबाहेर पडून जिल्हाधिकार्यांच्या आदेशांचा भंग केला. त्यामुळे, या व्यक्तिविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
१५ मार्चला परदेशातून एक व्यक्ती फलटण तालुक्यातील एका गावात आला होता. शासनाने दिलेल्या आदेशानुसार त्या गावातील पोलीस पाटील यांनी याबाबतची सूचना जिल्हा प्रशासनाला दिली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने त्वरित संबंधित व्यक्तीची तपासणी करून त्याचे विलगीकरण केले होते. त्याबाबत, व्यक्तीस २१ मार्चला नोटीसही देण्यात आली होती. त्याअनुषंगाने व्यक्तीने प्रशासनाचे आदेश पाळणे अपेक्षित होते. मात्र, हा व्यक्ती २४ मार्चला मॉर्निंग वॉकला गेला. याबाबतची माहिती त्या गावातील नागरिकांसह पोलीस पाटलांना समजल्यानंतर त्यांनी त्वरित याबाबतची तक्रार बरड पोलिसात दिली. त्यानुसार, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी विलगीकरण केलेल्या व्यक्तीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील विलगीकरण केलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केल्याचा हा पहिलाच प्रकार आहे. या घटनेनंतर फलटण तालुक्यात खळबळ माजली आहे.
हेही वाचा- #CORONA : साताऱ्यात ग्रामीण भागात बाजारपेठा बंद, शहरात मात्र सकाळी दुकाने सुरुच