कराड (सातारा) - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ( plateau of Sahyadri Tiger Project ) राखाडी पठारावर रंगीत गळ्याचा फॅन थ्रोटेड लिझार्ड अर्थात शारदा सुपरबा या नर सरड्याचे दर्शन ( Fan Throated Lizard found ) झाले. मादीला आकर्षित करण्यासाठी आपल्या बहुरंगी गळ्यातील पंखा फुगवून दाखवताना या नर सरड्याला कराडचे मानद वन्यजीव रक्षक वन्य अपराध नियंत्रण ब्युरोचे सदस्य रोहन भाटे यांनी त्याला आपल्या कॅमेर्यात कैद केले.
गळ्याचा पंखा फुगवून मादीला आकर्षित करतो - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील विस्तीर्ण पठारावर आढळणारी ही फॅन थ्रोटेड लिझार्ड अर्थात शारदा सुपरबा ही सरड्याची स्थानिक प्रजाती आहे. मोसमी वनस्पती, दगड, लहान गुहा आणि पठारावरील खडकांवर ही प्रजाती आढळते. त्याच्या गळ्याच्या पंख्याची हालचाल ही लक्ष वेधून घेण्यासाठी महत्त्वाची असते. रंगीत गळ्याचा सरडा म्हणूनही फॅन थ्रोटेडची ओळख आहे. विणीच्या काळात म्हणजे एप्रिल, मे महिन्यात नर सरड्याच्या गळ्याला सुंदर, आकर्षक रंगाची छोटीशी पिशवी दिसू लागते. विणीच्या काळात नर सरडा सकाळच्या वेळेस आपल्या लपण्याच्या जागेतून बाहेर येऊन, एखाद्या दगडावर वा उंच टेकाडावर जाऊन गळ्याची ही आकर्षक पिशवी फुगवून स्वत:चे अस्तित्व इतर जोडीदारांना दाखवून देतो. मादी जवळपास आहे का, याचाही अंदाज घेतो. मादी टप्प्यात असल्यास हा गळ्याचा आकर्षक पंखा जोरजोरात लहान मोठा फुगवून मादीला स्वत:कडे आकर्षित करतो.
वर्षातून तीनवेळा मादी अंडी घालते - नर फॅन थ्रोटेडचे मादीसोबत मीलन झाल्यानंतर मादी जमिनीमध्ये सुमारे सहा सेंटीमीटर खोलीचा लहान खड्डा तयार करून त्यात सुमारे 13 अंडी घालते. या अंड्यांवर पुढील पायाने माती लोटून हा खड्डा बुजवते. सर्वसाधारण 39 दिवसांच्या उबवणी काळानंतर या अंड्यांमधून सरड्याची पिल्ले बाहेर येतात. एका वर्षात मादी दोन-तीन वेळेस अंडी घालते.
हेही वाचा - पंढरपूरचे मंदिर बौद्ध विहार, आंबेडकर अभ्यासक आगलावे यांचा दावा