सातारा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दोन दिवसीय नियोजित सातारा जिल्हा दौरा असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही बुधवारी दुपारी अचानक हेलिकॉप्टरने महाबळेश्वर तालुक्यातील दरे या मूळगावी दाखल झाले आहेत. तीन दिवस ते मूळगावी राहणार असून या दौऱ्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.
दरे या आपल्या मूळगावी आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. रोजगारासाठी कांदाटी खोऱ्यातून मुंबई, ठाणे, पुणे सारख्या शहराकडे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी आणि स्थलांतरितांनी परत येण्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. कांदाटी खोऱ्यातील पर्यटन विकासाबरोबरच शेतकऱ्यांना वनौषधी, बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यावर भर देण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
कोयना धरणातील गाळ काढण्याचे आदेश : सातारा जिल्ह्यातील सर्व धरणांतील पाणी साठ्याची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. कोयना जलाशयातील जलसाठा कमी झाल्यामुळे गाळ काढण्याची संधी आहे. गाळ मुक्त धरण योजनेंतर्गत कोयना धरणातील गाळ उचलण्यात यावा. त्यामुळे जलाशयाच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाबळेश्वर, पाचगणी पर्यटन विकास आराखड्यासह विविध विषयांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.
मुख्यमंत्र्यांचा अचानक दौरा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर येणार असल्याची कोणतीही पूर्वसूचना प्रशासनाला नव्हती. सकाळी अचानक दौरा आल्यानंतर प्रशासनाने बंदोबस्ताची तयारी केली. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने दुपारी दोनच्या सुमारास दरे गावी दाखल झाले. यावेळी नूतन जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी हेलिपॅडवर त्यांचे स्वागत केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दोन दिवस सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. ते कराड मुक्कामी येणार आहेत. गुरूवारी दिवसभर भाजपने आयोजित केलेल्या कराडमधील कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी दहिवडीत त्यांची जाहीर सभाही होणार आहे.
दौऱ्याचे कारण गुलदस्त्यात : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सुट्टीसाठी गावी आले होते. त्यावरून राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली होती. खासदार संजय राऊत यांनी खोचक टीका देखील केली होती. त्यानंतर आता पुन्हा मुख्यमंत्री अचानक मूळगावी आले आहेत. त्यांच्या या दौऱ्यामागील नेमके कारण समजू शकलेले नाही. मुख्यमंत्री तीन दिवस दरे या मूळगावी असणार आहेत. त्यानुसार प्रशासनाने बंदोबस्त तैनात केला आहे. सध्या कोयना धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. बॅक वॉटरचा परिसर उघडा पडला आहे. लॉंच सेवा ठप्प आहे. त्यामुळे दरे गावी जाण्याचा मार्ग खडतर बनला आहे.
हेही वाचा -