सातारा- शिवेंद्रराजे आणि उदयनराजेंनी भाषणात बोलताना काही मागण्या केल्या. या मागण्यांची आता काळजी करण्याचे कारण नाही. छत्रपतींनी मागण्या करायच्या नाहीत, तर आदेश द्यायचा असतो आणि छत्रपतींचा आदेश हा मावळा पूर्ण करेल, असे मुख्यमंत्र्यांनी यांनी सांगितले. येथील सैनिक स्कूल मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते.
पुढच्या निवडणुकीचा निकाल लागलेलाच आहे. पुढे मैदानात उतरायला पैलवानच नाही. कोण तेल लावायलाही तयार नाही आणि आखाड्यात उतरायलाही तयार नाही. त्यामुळे ही संघर्ष यात्रा नाही, तर संवाद यात्रा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
हेही वाचा-जाणून घ्या.. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर काय म्हणतात सातारकर..!
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज साताऱ्यात दाखल झाली. शहरातून भव्य रॅली काढल्यानंतर सैनिक स्कूल मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, संजय काकडे, आमदार बाळा भेगडे, कांताताई नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा-राष्ट्रवादी उदयनराजेंचा पोटनिवडणुकीत दारुण पराभव करेल - नवाब मलिक
छत्रपतींच्या घराण्याकडून तुम्ही जितके घेतले, त्याच्या एक दशांश तरी त्यांना दिलेत का, असा खरमरीत सवाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर नामोल्लेख न करता हल्ला चढवला. छत्रपतींचे घराणे हे देणारे घराणे आहे, घेणारे नाही. तुम्ही त्यांना काही दिलेही नाही आणि त्यांनी कधी काही मागितलेही नाही. असे असताना त्यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे उत्तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला देईल, असे त्यांनी ठणकावले. दोन्ही महाराज कोणत्याही अटीवर भाजपमध्ये आलेले नाहीत. एकही वैयक्तिक काम घेऊन ते आले नाहीत. तर लोकहिताच्या कामांसाठी आले आहेत, असे मुख्यमंत्री बोलताना म्हणाले.