सातारा : छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे (शंभूतीर्थ) भूमीपूजन शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या हस्ते झाले. स्मारकासाठी मुख्यमंत्र्यांनी ८ कोटींचा निधी मंजूर करत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मास्टरस्ट्रोक खेळला आहे. शंभूतीर्थ हे तरूणांचे स्वप्न असून ते पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
स्मारकाचा 90 टक्के खर्च सरकार करणार - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी कराड दौर्यावर होते. या दौर्यात कृषी प्रदर्शनासह शासकीय इमारतींचे उद्घाटन त्यांनी केले. त्याचबरोबर तरूणांच्या अस्मितेचा प्रश्न असलेल्या शिवतीर्थासाठी मुख्यमंत्र्यांनी आवर्जुन वेळ दिला. स्मारकाचे भूमीपुजन त्यांनी केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज तथा खासदार उदयनराजे भोसले यांना देखील निमंत्रित करण्यात आले होते. नगरपालिकेच्या जागेतील नियोजित स्मारकासाठी नगरपालिकेला ८ कोटी रुपये वितरीत करण्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. प्रकल्प खर्चाचा ९० टक्के हिस्सा राज्य शासन आणि १० टक्के हिस्सा नगरपालिका उचलणार आहे.
स्मारकामुळे कराडच्या वैभवात भर - कृष्णा-कोयनेचा प्रीतिसंगम, दिवंगत यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ, दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, कोल्हापूर नाक्यावरील गांधी पुतळा, ऐतिहासिक मनोरे, नकट्या रावळ्याची विहिर, विजय स्तंभ, छत्रपती शिवाजी स्टेडियम या कराड शहराच्या वैभवातील महत्वाच्या खुणा आहेत. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक तथा शंभूतीर्थ प्रत्यक्षात उभे राहिल्यानंतर कराडच्या वैभवात आणखी एक भर पडणार आहे.