सातारा - जून महिन्यापासून चारा छावण्यांचे अनुदान न मिळाल्याने माण व खटावमधील छावणी चालक मेटाकुटीला आले आहेत. देणेकऱ्यांना देणी भागवताना छावनी चालकांचे हाल होत आहे. त्यामुळे छावनी चालकांनी याबाबत थेट मंत्रालयावर धडक देण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑगस्ट महिन्याची १६ तारीख उलटली मात्र माण व खटावमध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने चारा व पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. परिणामी सुरु झालेल्या चारा छावण्यांपैकी फक्त एकच चारा छावणी बंद झाली आहे. या चारा छावण्या एप्रिल महिन्यात सुरु झाल्या होत्या. छावणी चालकांना बिलाच्या रकमेपैकी एप्रिलचे ९० टक्के तर मे महिन्याचा ७५ टक्के अनुदान अदा झाले आहे. मात्र, जून व जुलै महिन्याच्या बिलाची रक्कम अजूनही थकीत आहे. खात्यावर दहा लाख रुपये शिल्लक असलेल्या संस्थांना छावणी चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु, अनेकांच्या बिलाची रक्कम ५० लाख ते एक कोटीपर्यंत गेली आहे.
अनुदान मिळाले नसल्याने छावणी चालकांना खर्चाचा ताळमेळ बसविताना मेटाकुटीला आले आहे. चारा (ऊस) तसेच पशुखाद्य (पेंड) देणारे उधार चारा देण्यास नकार देत आहेत. उसनवार करून झाले असून टक्केवारीवर पैसे घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळेच आज माण व खटावमधील सर्व चारा छावणी चालकांनी संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत प्रत्येक चारा छावणी चालकाने आपली समस्या पोटतिडकीने मांडली. या बैठकीत येत्या मंगळवारी मंत्रालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच तिथे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांची भेट घेऊन त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेण्याचे ठरले.
तब्बल ७६ दिवसांपासून बिलाची रक्कम अदा न झाल्याने चारा छावणी चालकांची अवस्था बिकट झाली आहे. यावर मार्ग काढण्यासाठी आम्ही सर्वजण मंत्री महोदयांची भेट घेऊन त्यांना आमचे गाऱ्हाणे सांगणार आहे. लवकरात लवकर बिलाची रक्कम अदा करावी अशी आमची मागणी आहे, असे रासप जिल्हाध्यक्ष बाबासाहेब ऊर्फ मामूशेठ विरकर यांनी सांगितले.