सातारा - रणजितसिंह मोहिते पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, युतीच्या काही नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना हे माहीत नसल्याचे दिसत आहे. यामुळे भर व्यासपीठावरच शिवसेनचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांच्याकडून मोहिते पाटलांवर अपमान सहन करण्याची वेळ आली आहे. शुक्रवारी वडूज येथे रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळक यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत हा प्रकार घडला.
लबाड राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांना आता युतीत प्रवेश देऊ नये, असे वक्तव्य शिवसेनचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी केले. त्यामुळे नक्की कोण कोणत्या पक्षाचा माणूस आहे. हेच समजत नसल्याचे समोर आले आहे. रासप तसेच भाजपचे नेतेदेखील टीका करताना, मागील पाच वर्षात माढा मतदारसंघात कामे झालीच नाहीत, असे म्हणत आहेत. तसेच २०१४ च्या निवडणुकीत सदाभाऊ खोत यांचा थोड्या मतांनी पराभव झाला, असे सांगत मोहिते पाटील भाजपमध्ये आल्याचे ते विसरले.
भाषण करताना काही वेळानंतर मोहिते पाटलांनी केलेल्या कामांची माहितीही व्यासपीठावर दिली. पण मागील पाच वर्षाचा ठपका मात्र, मोहिते-पाटील यांच्यावरती येत आहे. मोहिते-पाटील बोलताना म्हणाले, अनेक योजना पूर्ण करण्याचे काम हे सरकार करीत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, या नेत्यांची भाषणे ऐकताना कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पहायला मिळत होता.