कराड (सातारा) - कराड जवळच्या वाघेरी गावात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. यात चोरट्यांनी ५ तोळ्यांचे दागिने आणि १८ हजाराची रोकड असा सुमारे २ लाख २७ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी विलास पोपट शिंदे यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान,ओगलेवाडीत अन्य दोन ठिकाणीही घरफोडीचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी कराड ग्रामीण पोलीस तपास करत आहे.
परिसरात रात्रगस्त वाढविण्याची मागणी
तक्रारदार विलास शिंदे हे हजारमाची येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नोकरीला आहेत. सध्या ते कुटुंबासोबत ओगलेवाडी येथे राहतात. त्यांच्या वाघेरी या मूळ गावातील घराच्या वरच्या मजल्यावर त्यांची आई व भाऊ राहतात. विलास शिंदे हे शुक्रवारी रात्री वाघेरीतील घरी जाऊन घराची साफसफाई करून संध्याकाळी पुन्हा ओगलेवाडीला आले होते. त्यांनी कपाट व घराला कुलुप लावले होते. मात्र रविवारी सकाळी घराचे कुलुप तोडल्याची माहिती त्यांना शेजार्यांनी दिली. विलास शिंदे यांनी वाघेरी येथे जाऊन पाहिले असता अज्ञातांनी घराच्या दाराची कडी तोडल्याचे दिसून आले. कपाटातील लॉकरमधील ५ तोळ्यांचे दागिने आणि १८ हजार रूपयांची रोकड होती. असे सुमारे २ लाख २७ हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी त्यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान,ओगलेवाडी येथील कल्याण चाळीच्या पाठीमागील बाजूचीही दोन बंद घरे अज्ञात चोरट्यांनी फोडल्याचे उघडकीस आले आहे. मात्र या ठिकाणी चोरट्यांच्या हाती काही लागलेले नाही. ओगलेवाडी व वाघेरी येथे एकाच रात्री घडलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी ओगलेवाडी परिसरात रात्रगस्त वाढविण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.
हेही वाचा-बारामतीत महिलेच्या गळ्याला सुरा लावून घरातील रोख रकमेसह दागिने केले लंपास
हेही वाचा-कुटुंबावर जीवघेणा हल्ला करत माथेफिरूने कापली स्वतःची नस