सातारा - पाटण तालुक्यातील कसणीसारख्या दुर्गम भागात चरण्यासाठी सोडलेल्या जनावरांमधील एका म्हशीने शिकारीसाठी वापरण्यात येणाऱ्या स्फोटकाचा गोळा तोंडात धरून चावताच स्फोट झाला. यामुळे म्हशीचा जबडा फाटला असून ती गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणाचा तपास ढेबेवाडी पोलीस करत आहेत.
ढेबेवाडी भागातील कसणी हा भूकंपसदृष्य परिसर आहे. दुर्गम असलेल्या परिसरातील लोकांचा चरितार्थ दुग्ध व्यवसायावर चालतो. कसणी परिसरातील म्हाळुंगे नावाच्या शिवारात चरताना एका म्हशीने शिकारीसाठी ठेवण्यात आलेली हातबॉम्ब सदृश्य वस्तू चावताच तिचा स्फोट झाला. त्यात म्हैस गंभीररित्या जखमी झाली. वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी अज्ञातांकडून जंगलाच्या परिसरात हातबॉम्ब पुरून ठेवले जातात. वाल्मिकी पठारावर वन्य प्राण्यांची शिकार होते. डुकरांच्या शिकारीसाठीही अशी स्फोटके वापरली जातात. मध्य प्रदेशमधील लोक इकडे येऊन जंगल परिसरात स्फोटकांद्वारे शिकार करतात. गेल्या 20 वर्षापासून असे प्रकार सुरू आहेत. यापूर्वी कराड पोलिसांनी अशा पध्दतीने स्फोटकांचा वापर करणार्या शिकार्यांवर कारवाई करून मोठ्या प्रमाणात स्फोटके ताब्यात घेतली होती.
कसणीतील श्रीमती भागूबाई लक्ष्मण यादव यांच्यासह काही महिला कसणी गावाच्या नजीक असलेल्या म्हाळुंगे शिवारात जनावरांना चरण्यासाठी घेऊन गेल्या होत्या. दुपारी 2 च्या सुमारास जनावरे चरत असलेल्या ठिकाणी अचानक स्फोटाचा आवाज आला. महिलांनी आवाज्याच्या दिशेने धाव घेतली असता एका म्हशीचा जबडा पूर्णपणे फाटून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू असल्याचे दिसले. त्यांनी घाबरून आरडा ओरडा केल्यानंतर आजूबाजूचे शेतकरी गोळा झाले. म्हशीने चार्याबरोवर स्फोटकाचा गोळा तोंडात चावल्यानंतर स्फोट झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेची माहिती भागूबाई यादव यांनी ढेबेवाडी पोलीस ठाण्याला दिली आहे. म्हाळुंगे परिसरात अशी आणखी स्फोटके असावीत, असा संशयही त्यांनी पोलिसांकडे व्यक्त केला आहे. जंगल परिसरात स्फोटकांचा शोध घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.