सातारा - पश्चिम महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाई तालुक्यातील बावधनच्या बगाडाच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. कोरोनामुळे दोन वर्षांच्या ब्रेकनंतर यात्रा खुली झाल्याने भाविकांची गर्दी वाढलेली पहायला मिळत आहे.
हेही वाचा - राधिकाच्या जिद्दीपुढे गगनही ठेंगणे.. फौजदार बनलेल्या राधिकाच्या संघर्षमय प्रवासाची कहाणी..
बगाडाच्या यात्रेची खरी सुरुवात ही होळी पोर्णिमेला होते. काळभैरवनाथ मंदिरामध्ये व चावडीवरील होळी पेटविल्यानंतर गावामध्ये सर्व ठिकाणी होळी साजरी केली जाते. या दिवशी संध्याकाळी बगाडासाठी नवस केलेल्या सर्व मानकरी यांना देवाच्या गाभाऱ्यात व सभामंडपात बसविले जाते. सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत मंदिरामध्ये विधिवत पूजा करून होळी दिवशी रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान पुजारी कौल लावतात. प्रत्येक नवसपूर्ती व्यक्तींच्या नावाने गहू गाभाऱ्यामध्ये लावले जातात.
कौल लावून ठरतो बगाड्या
ठरावीक संकेत म्हणजे उजवा कौल ज्याच्या नावाने लागेल त्याच्यावर बगाड येते. ज्याच्यावर बगाड येईल तो बगाड्या व गावकरी मित्रपरिवार काळभैरवनाथ मंदिराला पाच फेऱ्या मारतो आणि 'काशीनाथाचे चांगभले'च्या गजरामध्ये संपूर्ण गाव भक्तिमय होऊन जातो. यानंतर होळीच्या रात्रीपासून ते बगाड होईपर्यंत बगाड्या मंदिरातच असतो.
आज मुख्य दिवस
रंगपंचमी दिवशी सकाळी बगाड्या, पालखीमधील देवदेवतांचे स्नान, विधिवत पूजा, आरती यानंतर बगाड्याचा पोशाख परिधान करतो व शेवटी बगाड्या कृष्णामाईची ओटी भरून सनई डफड्यांचा आवाज व 'काशीनाथाचे चांगभले' गजराने पूर्ण कृष्णाकाठचा परिसर दुमदुमून जातो. रंगपंचमीला खऱ्या अर्थाने बगाड रथास प्रारंभ होतो.
हेही वाचा - Leopard Attack : वैरण आणण्यासाठी गेलेल्या शेतकर्यावर बिबट्याचा हल्ला, शेतकरी गंभीर जखमी