सातारा - ठाण्याहून खटाव तालुक्यातील आपल्या गावी आलेल्या एका रिक्षाचालकासह दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. हे दोघेही कोरोना संशयित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल होते, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.
खटाव तालुक्यातील एक नागरिक ठाण्यावरून घरी आला होता. त्याला खबरदारीचा उपाय म्हणून क्वॉरंटाईन करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव आला आहे. तर दुसरा रूग्ण हा कराड तालुक्यातील आहे. कोरोनाबाधित असलेल्या रुग्णाचा तो संपर्कात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचाही अहवाल पॉझिटिव आला आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 121 झाली असून 84 रुग्ण कराड आणि सातारा शहरात उपचार घेत आहेत. 35 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 3 हजार 261 कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
सध्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात 3, कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये 66, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे 31, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे 18 व ग्रामीण रुग्णालय वाई येथे 14 असे एकूण 132 जण विलगीकरण कक्षात दाखल आहेत. या सर्वांचे वैद्यकीय नमुने पुण्याच्या बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.