कराड (सातारा) - फासकी (सापळा) लावून बिबट्याच्या शिकारीचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना कराडजवळच्या खोडशी गावात समोर आली आहे. बिबट्या फासकीत अडकल्याचे नागरिकांना आढळल्याने बिबट्याच्या शिकारीचा प्रयत्न फसला. परंतु, फासकीत पाय अडकल्याने बिबट्याच्या पायाचा पंजा तुटला आहे. याप्रकरणी वनविभागाने बाबू सखाराम जाधव (वय 45, रा. कार्वे-गोपाळनगर, ता. कराड) या संशयीतास अटक केली आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातील बहेली जमातीचे लोक वाघाच्या शिकारीसाठी वापरतात ती फासकी (सापळा) आढळल्याने वन विभागाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
फासकीत अडकलेला बिबट्या दहा महिन्याचा
बिबट्या लोखंडी फासकीत अडकल्याची माहिती खोडशी गावच्या पोलीस पाटलांनी वनविभागाला कळविली. माहिती मिळताच कराडचे वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल बी.सी. कदम, ए.पी. सवाखंडे, आर.ए. कुंभार, शितल पाटील, अश्विन पाटील, रमेश जाधवर, यु.एम. पांढरे, एम.एम. जाधव, योगेश बडेकर, शंभूराज माने हे घटनास्थळी दाखल झाले. अंदाजे दहा महिन्याच्या बिबट्याचा पाठीमागील डावा पाय लोखंडी फासकीत अडकला होता. बिबट्याला वनविभागाच्या पिंजर्यात घेण्यात आले. वराडे गावाच्या हद्दीतील वनविभागाच्या रोपवाटीकेत नेऊन बिबट्याच्या पायातील फासकी काढण्यात आली. मात्र, फासकीत अडकल्याने बिबट्याचा पंजा तुटून पायाला गंभीर दुखापत झाली. सध्या बिबट्यावर उपचार सुरू आहेत.
संशयीत वनविभागाच्या ताब्यात
मध्य प्रदेशातील बहेली जमातीचे लोक वाघाच्या शिकारीसाठी जी फासकी (सापळा) वापरतात, तशाच फासकीचा वापर खोडशी येथे बिबट्याच्या शिकारीसाठी करण्यात आल्याचे पहायला मिळाले. यामुळे वनविभाग खडबडून जागा झाला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वन विभागाच्या डॉग स्क्वॉडला पाचारण करण्यात आले. तसेच, खोडशी परिसरात कसून चौकशी केल्यानंतर बाबू सखाराम जाधव (वय 45, सध्या रा. खोडशी, मूळ रा. कार्वे-गोपाळनगर, ता. कराड) यांचे नाव निष्पन्न झाले. राहत्या घरामधून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 च्या कलम 9, 50 व 51 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सातार्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, वनक्षेत्रपाल तुषार नवले हे तपास करत आहेत.
बिबट्याच्या शिकारीचा पहिलाच प्रयत्न
कराड तालुक्यात बिबट्याच्या शिकारीचा प्रयत्न उघडकीस आल्यामुळे वनविभागाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. बिबट्याचा शेतशिवार आणि मानवी वस्तीत वावर वाढला आहे. उसाच्या शेतात बिबट्यांचा अधिवास वाढला आहे. याचाच फायदा घेऊन शिकारी बिबट्याच्या शिकारीचा प्रयत्न करू लागल्याचे खोडशीतील घटनेमुळे अधोरेखित झाले आहे. लोखंडी फासकीचा वापर करून बिबट्याच्या शिकारीचा झालेला हा सातारा जिल्ह्यातील पहिलाच प्रयत्न असल्याचे वनविभागाच्या सुत्रांनी सांगितले.
घारीला बंदिस्त करून ठेवलेल्या हॉटेलवर छापा
पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील बेलवडे हवेली गावच्या हद्दीत हॉटेल राऊमध्ये घारीला पिंजर्यात बंदिस्त करून ठेवल्याची माहिती पुणे येथील मानद वन्यजीव रक्षक आदित्य परांजपे यांना मिळाली. त्यांनी वनविभागाला कळविताच वन विभागाने हॉटेलवर छापा मारून पिंजर्यातील घार ताब्यात घेतली. या प्रकरणी हॉटेल मालक विवेक रामचंद्र देशमुख यांना वनविभागाने नोटीस बजावली आहे.
![Attempt to hunt leopards near Karad](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14417747_th.jpg)
हेही वाचा - Lowest temperature in Mahabaleshwar : कडाक्याच्या थंडीने महाबळेश्वरमध्ये गोठले दवबिंदू