सातारा : माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सातारा पंचायत समितीचे माजी उपसभापती जितेंद्र सावंत यांच्यावर तरुणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने रविवारी रात्री प्राणघातक हल्ला (Assault on former deputy chairman of Satara Panchayat Samiti) केला आहे. या हल्ल्यात ते गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे लिंब (ता. सातारा) गावात तणावाचे वातावरण आहे.(Satara Crime)
धारदार शस्त्राने वार : लिंब गावातील शेतात हा हल्ला झाला आहे. तरूणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने जितेंद्र सावंत यांच्या मानेवर, चेहऱ्यावर वार केले आहेत. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या हल्ल्यानंतर लिंब गावातील वातावरण तणावपूर्ण बनले. साताऱ्यातील रुग्णालय परिसरात त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली.
हल्ल्यामागील कारण अस्पष्ट : पंचायत समितीच्या माजी सभापतीवर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती मिळताच सातारा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत गावात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी पथक रवाना केले. या घटनेमुळे सातारा तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. जितेंद्र सावंत यांनी पंचायत समितीचे उपसभापती तसेच जिल्हा परिषद सदस्य म्हणून केलेले काम उल्लेखनीय होते.