सातारा - शाहूपुरीजवळ आंबेदरे येथे वनविभागाच्या भरारी पथकाने छापा मारून लाकुडाची विनापरवाना अवैध वाहतूकप्रकरणी दोन वाहनांसह सुमारे ८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा - भूकंपाच्या धक्क्याने सातारा हादरला; रिश्टरस्केलवर 2.9 तीव्रतेची नोंद
प्रल्हाद वसंतराव शेंडगे (रा. गडकर आळी, सातारा) आणि बाजीराव प्रकाश लोंढे (रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) अशी आरोपींची नावे आहेत. वन विभागाच्या भरारी पथकाचे प्रमुख सचिन डोंबाळे यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांना बेकायदा लाकूड वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे आंबेदरे (ता. जि. सातारा) येथे सापळा लावण्यात आला. लाकूड मालाची विनापरवाना अवैध वाहतूक करीत असताना ट्रॅक्टर (क्र. एम.एच-11 जी 4543, ट्रॉली क्र. एम.एच-11 आर. 670) व पिकअप (क्र. एम.एच - 11 टी. 2564) अशी दोन वाहने वन विभागाच्या भरारी पथकाने ताब्यात घेतली.
याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई भरारी पथकाचे प्रमुख, वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे, वनपाल दिपक गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल राजेश विरकर, सुहास पवार, वनरक्षक विजय भोसले यांनी केली. मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे, ड्रोंगो संस्थेचे अध्यक्ष सुधीर सुकाळे व ओंकार ढाले यांनी त्यांना सहकार्य केले.
नागरिकांना आवाहन
अशा प्रकारे अवैध लाकूड वाहतूक किंवा वन्यजिवाची शिकार होत असल्यास त्याची माहिती जागरुक नागरिकांनी १९२६ या टोल फ्री क्रमांकावर द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त राखण्यात येईल, असे आवाहनही सचिन डोंबाळे यांनी केले.
हेही वाचा - साताऱ्यात म्यूकरमायकोसिसचा उद्रेक; 28 रुग्ण, 3 मृत्यू