सातारा- जिल्हा मध्यवर्ती कारागृहात काही कैद्यांनी एकत्र येत एकाला बेदम मारहाण केली आहे. या घटनेमुळे कारागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा- ट्रकचालक खून प्रकरणातील सहा आरोपींना पुण्यातून अटक, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त..
विष्णू भगवान केकाण, विजय बाळू माने, भारत कमलाकर जाधव, सुरज मारुती धस, आकाश खुशालसिंग चव्हाण, अतुल सतीश क्षीरसागर, शाम सहदेव यतनाळकर (सध्या सर्व रा.सातारा कारागृह) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पीडित रुपेश उर्फ पप्पू शिवाजी चव्हाण (वय 27, मूळ रा.आभेपुरी ता.वाई सध्या रा.सातारा कारागृह) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार व सर्व आरोपी जिल्हा कारागृहात विविध गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. दि. 7 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कारागृहात अचानक गोंधळ होवून हाणामारी झाली. ही बाब कारागृहातील पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कैदी हाणामारी करत असल्याने कारागृह पोलिसांनी ती भांडणे सोडवली. सर्वांना बाजूला केले. या घटनेत रुपेश चव्हाण जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. या सर्व घटनेमुळे कारागृहामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
डॉक्टरांनी दिलेल्या सर्व गोळ्या समोरच खा, असे मारहाण करणाऱ्यांनी म्हटले यावरून वाद झाल्याचे समोर आले आहे. तक्रारदाराने दिलेल्या जबाबात मारहाण करणाऱ्यांनी दमदाटी करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.