कराड (सातारा) - व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटनाला अखेर महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने परवानगी दिली आहे. यामुळे पर्यटकांना दिलासा मिळाला असून ऐन पावसाळ्यात निसर्ग पर्यटन बहरणार आहे. मेळघाट, पेंच, ताडोबा-अंधारी, सह्याद्री आणि नवेगाव-नागझिरा या व्याघ्र प्रकल्पांमध्ये निसर्ग पर्यटन सुरू होणार आहे. परंतु, पर्यटकांना अटी-शर्तींचे पालन करावे लागणार आहे. पर्यटकांचे थर्मल स्कॅनिंग करणे आवश्यक आहे. मास्क वापरणे सक्तीचे आहे. सॅनिटायझर डिस्पेन्सरची सोय करणेही बंधनकारक आहे.
कोविड-19 प्रसार नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाकडे व्याघ्र प्रकल्पात पर्यटनास परवानगी देण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार अंत्यत काटेकोरपणे कोविड-19 च्या निर्देशांचे पालन करुन तसेच स्थानिक अधिकार्यांचे मत विचारात घेऊन पर्यटन सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
कोविड-19 ची राज्यातील सुधारीत परिस्थिती पाहता व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणार्या संरक्षित क्षेत्रात निर्सग पर्यटन सुरु करण्याबाबत अटी, शर्तीच्या अधिन राहून, बंदिस्त प्राण्यांच्या ठिकाणी पर्यटक जाणार नाहीत, याची खबरदारी घेऊन तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन 30 जूनपर्यंत व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी खुले करण्यास परवानगी देण्यात आली आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील रस्ते खराब होणार नाहीत व संरक्षणावर विपरीत परीणाम होणार नाही, याची खबरदारीही घ्यायची आहे. याशिवाय पर्यटनासाठी येणार्या व्यक्तींचे थर्मल स्कॅनिंग, फूट ऑपरेटेड डिस्पेन्सद्वारे सॅनिटायजेशन करणे आवश्यक आहे. तसेच पर्यटनासाठी येणार्यांनी मास्कचा वापरणे करणे बंधनकारक आहे. शासनाच्या या मार्गदर्शक सुचनांचे आणि अटींचे वन कर्मचार्यांमार्फत संनियंत्रण करण्यात यावे. पर्यटकांचा वारंवार संपर्क येणार्या ठिकाणी सातत्याने सॅनिटायझर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
कोयनेत पर्यटकांची वर्दळ वाढणार -
कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक महिन्यांपासून बंद असलेली कोयनानगरमधील पर्यटनस्थळे पावसाळ्यात बहरणार आहेत. निसर्गाने मुक्त हस्ते उधळ केलेल्या कोयनानगरमध्ये पावसाळ्यात पर्यटकांची तुफान गर्दी होते. कोयना धरण, उंचावरून कोसळणारा ओझर्डे धबधबा, नेहरू गार्डन ही प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना आकर्षित करतात. पावसात चिंब भिजत निसर्गाचा मनमुराद आनंद लुटणे, हा विलक्षण अनुभव असतो. शासनाने पर्यटनस्थळे खुली केल्याने पर्यटकांची पावले आता कोयनेकडे वळू लागली आहेत. कोयनेबरोबरच सातारा जिल्ह्यातील सडावाघापूर, ठोसेघर येथील फेसाळत कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक येत असतात.