सातारा - गुन्हेगारांवर कायदा आणि सुव्यवस्थेच्यादृष्टीने जरब बसावा म्हणून सातारा पोलीस अधिक्षक तेजस्वीनी सातपुते यांनी तीन जणांवर एक वर्ष तडीपारची कारवाई केली आहे. यात वाळू चोरी करणे, सरकारी कर्मचार्याला मारहाण, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी गोळा करणे या कारणांमुळे कारवाई केल्याचे सातपूते म्हणाल्या.
हेही वाचा - धुळे: 12 वर्षीय चिमुकलीवर 42 वर्षीय नराधमाचा अत्याचार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
सख्ख्या भावांसह एकूण तिघांना सातारा, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील तिघांवर कारवाई करण्यात आली. निलेश महादेव तेलखडे (वय ३२), गणेश महादेव तेलखडे (वय 36, दोघे रा.मलटण) व उमेश सुदाम यमपुरे (वय 32, रा.भाडळी खुर्द सर्व ता.फलटण) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. यात गणेश तेलखडे हा टोळीप्रमुख आहे.
हेही वाचा - झारखंडमध्ये पुन्हा मॉबलिंचिंग; एकाचा मृत्यू दोन गंभीर जखमी
संशयितांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर त्या त्या वेळी पोलिसांनी कारवाई केली. मात्र, तरीही संशयितांमध्ये सुधारणा झाली नाही. याउलट संशयितांच्या दहशती कारवाईमुळे सर्वसामान्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. संशयितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होवू लागली. यामुळे संशयितांकडून भविष्यात मोठी हिंसक घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. फलटण पोलिसांनी संशयित तिघांचा तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन तो पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे पाठवला. याबाबतची सुनावणी झाल्यानंतर शुक्रवारी तिघांना तडीपार करण्यात आले. संशयितांना सातारा जिल्ह्यातून तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामधून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले.
हेही वाचा - अमरावतीच्या महादेव खोरी परिसरात अनैतिक संबंधातून युवकाची हत्या