सातारा - राजवाडा येथे संचार बंदी काळात किराणा मालाची दुप्पट किमतीने विक्री करणाऱ्या किराणा दुकानदार व मास्क तिप्पट किंमतीने विकणाऱ्या औषध दुकानदार अशा दोघांवर साताऱ्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राजवाडा येथील चांगण किराणा स्टोअर व तांदुळ आळीतील मोडक केमिस्ट या दुकानदारांवर ग्राहकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतात संचारबंदी आदेश लागू केला आहे. या कालावधीत सध्या लोक जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाहेर पडत आहेत. अशा जीवनावश्यक वस्तूंची सेवा दुकानदारांनी बाजारभावाप्रमाणे विकण्याबाबत यापूर्वीच शासन व जिल्हाधिकाऱयांनी आदेश दिले आहेत. तरीही राजवाडा परिसरात ३५ रुपयांची साखर ७० रुपये किलो या दुप्पट किंमतीने किराणा दुकानदाराने एका ग्राहकाला विकली. ३० रुपयांचा मास्क मोडक केमिस्ट मधून १०० रुपयांना विकला गेला.
याबाबत दोन्ही ग्राहकांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. राष्ट्रीय आपत्तकालीन परिस्थितीत जिवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार केल्याप्रकरणी दोन्ही दुकानदारांवर भारतीय दंड विधान संहिता व अत्यावश्यक सेवा अधिनियम नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.