सातारा- अवघ्या एका महिन्यात सातारा पालिकेच्या मुख्याधिकारी रंजना गगे यांची पुण्याला उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. गगे यांच्या जागेवर सातारा पालिकेच्या कामकाजाचा अनुभव असलेले अभिजीत बापट यांची नियुक्ती झाली आहे.नगरविकास विभागाने मंगळवारी याबाबतचा आदेश काढला आहे. सोलापूर महापालिकेत उपायुक्तपदावरुन ते बुधवारी साता-यात मुख्याधिकारी पदी रुजू होत आहेत.
अभिजीत बापट यांनी यापुर्वी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात २०११-१२ मध्ये प्रकल्पाधिकारी म्हणून काम केले. २०१२ ते २०१६ या काळात मुख्याधिकारी म्हणून त्यांनी पालिकेचे कामकाज पाहिले आहे. त्यानंतर पंढरपूर पालिका व सोलापूर महापालिकेत त्यांची बदली झाली होती. सोलापूरहून येऊन ते साता-यातील पदभार स्वीकारतील.
सातारा नगरपालिकेत २०१६ ते २०२० हा चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे मुख्याधिकारी शंकर गोरे यांची ७ जुलै रोजी बदली झाल्याने त्यांच्या जागेवर अकोला महापालिकेच्या उपायुक्त श्रीमती रंजना गगे रुजू झाल्या होत्या. मात्र, महिन्याभरातच त्यांना पुण्याला उपायुक्त म्हणून जावे लागले.
नगरअभियंतापदी दिलीप चिद्रे
दरम्यान, सातारा पालिकेतील कायम वादग्रस्त राहिलेले नगर अभियंता भाऊसाहेब पाटील यांची बदली झाली असली तरी त्यांना अद्याप वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या रिक्त जागेवर यापुर्वी नगर अभियंता म्हणून काम केलेले दिलीप चिद्रे यांची नेमणूक झाली आहे. चिद्रे लातूर महापालिकेतून कार्यकारी अभियंता पदावरुन बदलून साता-यात नगर अभियंता म्हणून येत आहेत. यापुर्वी तीन वर्षे सातारा पालिकेत त्यांनी नगर अभियंता म्हणून काम केले आहे.