सातारा - जिल्हा रुग्णालयातील कोव्हिड केअर सेंटरला काम करणाऱ्या लॅब टेक्निशियनला शेजारी त्रास देत असल्याचा प्रकार साताऱ्यात समोर आला आहे. शेजाऱ्यांनी घरमालकाला सदर महिलेला घरातून काढून टाकायला सांगत नाहक त्रास दिला, अशी तक्रार महिलेने केली आहे.
घडलेला प्रकार असा की, तक्रारदार महिला या जिल्हा रुग्णालयातील कोव्हिड केअर सेंटरला लॅब टेक्निशियन म्हणून काम करतात. त्या तामजाईनगरात कृष्णकुंज अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहतात. त्यांच्या शेजारी राहणारे नंदकुमार बाळकृष्ण साबळे, निलीमा नंदकुमार साबळे, सुर्यकांत शामराव अदाटे व कुमोदिनी सुर्यकांत अदाटे (सर्व रा. कृष्णकुंज अपार्टमेंट, समृध्दी कॉलनी तामजाई नगर) हे तक्रारदार महिलेस त्रात देत आहेत. तक्रारदार महिलेला येथे राहू दिल्यास आम्हाला संसर्ग होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही महिलेला घरातून काढून टाका, असे घरमालकाला सांगितले. या प्रकारामुळे तक्रारदार महिलेस मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे त्यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या चार जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
नंदकुमार बाळकृष्ण साबळे, निलीमा नंदकुमार साबळे, सुर्यकांत शामराव अदाटे व कुमोदिनी सुर्यकांत अदाटे या सर्वांवर कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमिवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 (ब) महाराष्ट्र कोविड अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.