कराड (सातारा) - पूर्वेकडील सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढल्यामुळे कोयना धरणाचे रिव्हर स्विस गेट साडे तीन फुटाने उघडून धरणातून प्रतिसेकंद 1 हजार 300 क्यूसेक आणि पायथा वीजगृहातून 2100 क्यूसेक, असा एकूण 3 हजार 450 क्यूसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक...
पूर्वेकडील सिंचनासह पिण्यासाठी पाण्याची मागणी वाढल्यामुळे कोयना धरणातून सोडण्यात आले आहे. मागील वर्षी दमदार पावसामुळे कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे सिंचनासह पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली. तसेच वीजनिर्मितीसाठीही धरणात मुबलक पाणीसाठा आहे. कोयना धरणाची सध्याची पाणी पातळी 2120.05 फूट आणि 646.30 मीटर असून त्यात 61.59 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
कोयना-कृष्णा नद्यांचे पात्र भरले...
गतवर्षी धरण पाणलोट क्षेत्रात मुबलक पाऊस झाला. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले. धरणातील पाण्याचे योग्य नियोजन केल्याने सध्या धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. पूर्वेकडील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा आरक्षित कोटा आणि वीजनिर्मितीच्या कोट्याचेही पाणी मुबलक आहे. कडक उन्हाळ्यामुळे सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी होताच कोयना धरणातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात कृष्णा आणि कोयना नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कराडजवळच्या टेंभू येथील वीजनिर्मिती प्रकल्पाला आणि घाटावरील शेतीलाही कॅनलद्वारे मुबलक पाणी पुरवठा होत आहे.