सातारा - कराड येथील कृष्णा रुग्णालयामध्ये उपचार घेणारे चार जण बुधवारी कोरोनामुक्त झाले. कोरोना विशेष वार्डमध्ये सेवा बजावणाऱ्या 'कोरोना वॉरियर्स'च्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन आणि टाळ्यांच्या गजरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
कोरोनासारख्या संकट काळात कृष्णा रुग्णालयाच्या कोरोना विशेष वार्डमध्ये अनेक डॉक्टर्स, परिचारिका सेवा बजावित आहे. त्यांनी दाखविलेल्या धैर्यामुळे आजपर्यंत एकूण 27 रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात कृष्णा रुग्णालयाला यश आले आहे. नर्सिंग स्टाफच्या धैर्याला सलाम करण्यासाठी कोरोनामुक्त रुग्णांचा सत्कार करण्याचा मान त्यांना देण्यात आला.
कृष्णा रुग्णालयामधून बुधवारी डिस्चार्ज देण्यात आलेल्या कोरोनामुक्त रुग्णांमध्ये वनवासमाची येथील 56 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला, मलकापूर येथील 75 वर्षीय महिला आणि 16 वर्षीय मुलाचा समावेश आहे. यावेळी कृष्णा रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. रोहिणी बाबर, डॉ. संजय पाटील, डॉ. व्ही. सी. पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्यासह वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.