कराड (सातारा) - कराडच्या वाखाण रोडवरील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील 90 हजाराची रोकड आणि दागिने मिळून 4 लाख 90 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. घर मालक मुंबईला गेल्यानंतर चोरट्यांनी हा डाव साधला. याप्रकरणी अवधूत भरतसा कलबुर्गी यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारदार अवधूत कलबुर्गी यांची मुलूंड (मुंबई) ही सासरवाडी आहे. 11 जून रोजी ते कुटुंबीयांसह मुलूंडला गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी कराडच्या प्रकाशनगर भागात वाखाण रोडवर असलेल्या त्यांचे बंद घर फोडले. घरातील कपाटात ठेवलेली 90 हजाराची रोकड तसेच दोन तोळ्याचे लेडीज ब्रेसलेट, 12 ग्रॅमची नथ, 6 ग्रॅमची सोनसाखळी, 3 ग्रॅमची अंगठी, 10 ग्रॅमची चांदीची तीन ब्रेसलेट, 900 ग्रॅमचा चांदीचा तांब्या, 90 ग्रॅमचे चांदीचे तीर्थपात्र, चमचा, 2 निरंजन, कुंकवाचा करंडा, कानातील सात कुड्या, असा एकूण 4 लाख 90 हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
मुलूंडवरून परत आल्यानंतर घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तुटल्याचे तसेच गोदरेज कपाटासह ड्रॉव्हरचे कुलूप तुटल्याचे दिसले. कपाटातील रोकड व सोन्या-चांदीचा ऐवजाची चोरी झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
कराड शहर पोलिसांनी श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण केले. डीवायएसपी डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे तपास करत आहेत.