कराड (सातारा) - लग्न समारंभासाठी पुण्याला जाताना भरधाव स्विफ्ट कारचा रविवारी दुपारी दीडच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावर कराडजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील चार कोतवाल जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला. मृत आणि जखमी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून, या घटनेमुळे सिंधुदूर्ग जिल्हा प्रशासनावर शोककळा पसरली आहे.
निलेश चिंतामणी मोंडकर (रा. खवणे, ता. वेंगुर्ले), मनोज मनोहर परब (रा. बाव, ता. कुडाळ), अंकुश देवबा शिंदे (रा. कुंभारभाट, ता. मालवण), भरत महाळू बोडेकर (रा. वैभववाडी, कणकवली) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. रोशन रामा वरग (रा. निरूगे, ता. कुडाळ) हा गंभीररित्या जखमी असून त्याच्यावर कराडमधील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्गहून कोल्हापूरमार्गे हे सर्वजण पुण्यातील लग्न समारंभासाठी चारचाकीने निघाले होते. पुणे-बंगळुरू महामार्गावर वहागाव (ता. कराड) हद्दीत भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावरून सातारा-कोल्हापूर लेनवर गेली. त्यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाबरोबर स्वीफ्ट कारची भीषण धडक झाली. या अपघातात कारमधील चार जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीररित्या जखमी झाला. अपघातात चारचाकीचा चक्काचूर झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच तळबीड पोलीस ठाणे आणि महामार्ग वाहतूक नियंत्रण केंद्राच्या अधिकारी, कर्मचार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. महामार्ग हेल्पलाईनचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. अपघात एवढा भीषण होता की कारमधील मृतदेहही लवकर बाहेर काढता आले नाहीत. कारमधील एका जखमीला तातडीने कराडच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याने दिलेल्या माहितीवरूनच मृतांची ओळख पटली.
हेही वाचा : धारणी पोलीस ठाण्याचे एपीआय अतुल तांबे यांची गळफास घेऊन आत्महत्या