सातारा - राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील सुमारे २ हजार ५०० भावी आयआयटीएनस् ना कोणीच वाली नाही अशी स्थिती आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे सरकार आपापल्या राज्यात जाण्यासाठी काही विद्यार्थ्यांना परवानगी देत असले तरी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने सर्वच विद्यार्थ्यांना आपल्या मायभूमीत सुरक्षीत परत आणण्याची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.
राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात आयआयटी कोचिंगसाठी गेलेले महाराष्ट्रातील सुमारे १ हजार ६०० विद्यार्थी आणि काही पालक त्याचठिकाणी अडकून पडले आहेत. यात सातारा जिल्ह्यातील ३५ जण आहेत. साताऱ्याचा अथर्व भागवत आणि त्याची आई सुजाता राजेंद्र भागवत कोटा जिल्ह्यात अडकून पडले आहेत. तेथे अडकलेल्या विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील बहुसंख्या विद्यार्थी कोटामध्ये कोचिंगसाठी गेले आहेत
आमच्या प्रतिनीधीने अथर्व भागवतशी संपर्क साधून, तेथील परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. राजस्थानमधील कोरोना संसर्ग साथीची परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत असून, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कधीही संपुर्ण शहर बंद होईल. त्यामुळे सर्व विद्यार्थी चिंतेत असल्याचे त्याने सांगितले.
कोटा येथील जिल्हाधिकारी यांनी अडकून पडलेले विद्यार्थी आणि पालकांना त्यांच्या राज्यात परतण्यासाठी वैयक्तिक परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, उत्तराखंड, हरियाणा या राज्यांनी त्यांच्या राज्यातील विद्यार्थी परत आणण्याची परवानगी घेऊन त्यांना बसेस पाठवून आपापल्या राज्यात नेले आहे. महाराष्ट्र सरकारने बसेस पाठवून येथील सर्व महाराष्ट्रीयन विद्यार्थांना परत न्यावे, अशी कळकळीची विनंती त्याने केली.
गेल्या २ आठवड्यापासून आम्हीं कुटुंबिय चिंतेत आहोत. आमचा अथर्व व त्याची आई
यांना साताऱ्याला परत पाठवण्यासाठी तेथील खासदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहोत. आम्हाला परवानगी मिळाली आहे. उद्यापर्यंत दोघेही साताऱ्यात पोहचतील, असे राजेंद्र भागवत यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
राजस्थानातील कोटा येथे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकार परत आणेल - विजय वडेट्टीवार
राज्य सरकारने केंद्र सरकारकडे विद्यार्थ्यांना परत आणण्याची परवानगी मागितली आहे. शिवाय राजस्थान सरकारला देखील या संदर्भात पत्र लिहिल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
संचारबंदीत राजस्थानातील कोटा येथे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी येत्या दोन दिवसात कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांची यादी प्राप्त झाल्याची महिती राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.