पाटण: तालुक्यातील ढेबेवाडी खोर्यात (Dhebewadi valley in Patan taluka) मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाच्या पाण्याचा लोट आल्याने दुर्गम भागातील कसणी (The Kasani bridge was swept away) गावाजवळचा पूल आणि भराव वाहून गेला आहे. त्यामुळे दुर्गम भागातील २५ गावे (25 villages in remote areas without communication) संपर्कहीन झाली आहेत. कसणी गावासह निगडे, घोटील, म्हाईंगडेवाडी तसेच वाड्या-वस्त्या संपर्कहीन झाल्या आहेत.
दळणवळण ठप्प, विद्यार्थ्यांचे हाल: ढेबेवाडी खोर्यातील निवी, कसणी, घोटील, निगडे, म्हाइंगडेवाडीसह 25 हून अधिक दुर्गम गावे, वाड्यावस्त्यांना जोडणारा पवारवाडी-म्हाईंगडेवाडी हा एकमेव मार्ग आहे. कसणीजवळचा कमी उंचीच्या पुलाची गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीत मोठी दुरवस्था झाली होती. आता पुलासह भराव वाहून गेल्याने सर्व दळणवळण ठप्प झाले आहे. विद्यार्थ्यांचा शाळा-महाविद्यालयात जाण्याचा मार्गच बंद झाला आहे.
दुर्गम भागातील गावे संपर्कहीन: गतवर्षी दुरवस्था झालेल्या पुलावर नागरीकांनी, पावसाळ्यानंतर श्रमदानातून ओढ्यातील वाळू व दगड गोट्यांचा भराव टाकून दळणवळण सुरू केले होते. यंदाही नागरीकांनी पुलाखालील गाळाने भरलेल्या सिमेंटच्या पाईप मोकळ्या केल्या होत्या. मात्र जोरदार पावसाने पुलावर पाणी येवून पुलाचा भराव वाहून गेला. यामुळे कसणी, घोटील, निगडे, म्हाईंगडेवाडीसह परिसरातील वाड्यावस्त्या संपर्कहीन झाल्या आहेत. कसणीचे सरपंच महेंद्र गायकवाड तसेच ग्रामस्थ पुलाजवळ थांबून नागरीकांना पाण्यात न उतरण्याबाबत सूचना करत आहेत.
महिंद धरण ओव्हर फ्लो: ढेबेवाडी खोर्यातील वांग नदीवर असणारे महिंद धरण ओव्हर फ्लो झाले आहे. ढेबेवाडी खोर्यात पावसाचा जोर वाढल्याने वांग, मराठवाडी येथील धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. संततधार पावसामुळे वांग नदीवरील महिंद धरण तुडूंब भरले असून धरणाचे पाणी आता सांडव्यावरून वाहत आहे. धरणाकडे कोणीही जाऊ नये, अशा सूचना महिंद ग्रामपंचायतीने दिल्या आहेत. तसेच धरणाकडे जाणार्यांवर देखील लक्ष ठेवले आहे.