कराड (सातारा) - अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन पीडित मुलीस कुमारी माता ( Abusing Minor Girl ) बनविणार्या आरोपीस कराड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश के. एस. होरे यांनी 20 वर्षे सश्रम कारावास ( Rigorous Imprisonment ) आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. राकेश सदाशिव कांबळे (वय 30 वर्षे, रा. शनिवार पेठ, कराड), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
सोबतीसाठी बोलाविलेल्या आरोपीकडून अत्याचार - पीडित मुलीच्या कुटुंबात कोणीही पुरुष नसल्यामुळे कुटुंबियांनी आरोपीला सोबतीसाठी घरी झोपण्यास बोलविले होते. त्यावेळी आरोपी राकेश कांबळे याने मुलीशी जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर मुलगी गर्भवती राहिली. तीला यशवंतनगर-सांगली येथील भगिनी निवेदिता प्रतिष्ठानच्या स्वाधारगृहात पाठविण्यात आले. सांगलीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात मुलीने बाळाला जन्म दिला. याप्रकरणी दि. 30 नोव्हेंबर, 2019 रोजी पीडित मुलीने कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून आरोपीवर अत्याचार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता.
सरकारी वकीलांचा युक्तिवाद ठरला महत्वाचा - कराड शहर पोलीस ठाण्यातील तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक एस.एस. जमदाडे यांनी या गुन्ह्याचा तपास करुन आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. राजेंद्र शहा यांनी सहा साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा युक्तिवाद आणि न्यायालयासमोर सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी राकेश कांबळे याला वीस वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिना साधी कैदही सुनावण्यात आली आहे. यामध्ये डीएनए अहवाल, पीडित मुलीचा जबाब, तपास अधिकारी व घटनास्थळ पंच, पीडितेवर केलेले उपचार, बाळाची डीएनए चाचणी अहवाल या बाबी सुनावणीमध्ये महत्त्वपूर्ण ठरल्या. डीएनए अहवालावरुन पीडिता ही जन्मलेल्या मुलाची कुमारी माता व आरोपी हा पिता असल्याचे समोर आले होते. न्यालयासमोर आलेल्या पुराव्यावरून न्यायाधीश के. एस. होरे यांनी आरोपीस शिक्षा सुनावली.
हेही वाचा - Student Died In Road Accident : दहावीचा शेवटचा पेपर देवून घरी जाताना अपघात.. विद्यार्थ्याचा मृत्यू