सातारा- गृहराज्यमंत्री आणि पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांनी स्व. शिवाजीराव देसाई चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने पाटण विधानसभा मतदारसंघात १० हजार मास्कचे वाटप केले आहे. मास्क वाटपाचा हा पहिला टप्पा असून यापुढे आणखी मास्कचे वितरण करण्यात येणार आहे.
पाटण विधानसभा मतदारसंघातील अनेक लोक नोकरी, कामधंद्याच्या निमित्ताने मुंबई, पुणे शहरात स्थायिक आहेत. त्यापैकी बहुतांश नागरिक हे आपापल्या गावी आले आहेत. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन गृहराज्यमंत्री आमदार देसाई यांनी स्व. शिवाजीराव देसाई चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने पहिल्या टप्प्यात १० हजार मास्कचे वाटप केले आहे.
देसाई यांचे समर्थक असलेले विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काल (दि. २४) खेड्यापाड्यात जाऊन वयोवृध्द नागरिक, महिला, युवकांना मास्कचे वाटप केले होते. कोणतेही संकट आले तरी त्या संकटाला न डगमगता आपल्या कर्मभूमीतील जनतेला आधार देण्याची भूमिका आमदार शंभूराज देसाई यांनी नेहमीच घेतली आहे. सदर उपक्रमातून याचा प्रत्यय त्यांनी पुन्हा आणून दिला आहे. सहा महिन्यापूर्वी पाटण मतदारसंघात अतिवृष्टीचे व महापुराचे संकट आले होते. त्यावेळी देखील आमदार देसाई यांनी पूरग्रस्तांना दिलासा दिला होता.
हेही वाचा- साताऱ्यात कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळला; शासकीय रुग्णालयात दाखल