सातारा - पाटण तालुक्यातील डेरवण येथील १० महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाली होती, आता ते बालक कोरोनामुक्त झाले असून उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले आहे. सध्या पाटण तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. या बालकाच्या कुटुबीयांच्या संपर्कात आलेल्या २२ लोकांना पाटण येथील कोरोना केअर सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या सर्वांचे स्वॅब नमुने गुरुवारी घेण्यात येणार असून हे नमुने निगेटिव्ह आले तर या सर्वांनाही त्यानंतर घरी सोडण्यात येईल, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. पाटील यांनी दिली.
पाटण तालुक्यात कोरोना महामारी दरम्यान मुंबई, पुणे आदी शहरातून हजारोंच्या संख्येने लोक आले आहेत. वास्तविक प्रशासकीय पातळीवर भलेही हा आकडा काही हजारात असला तरी प्रत्यक्षातील आकडेवारी याहीपेक्षा कितीतरी मोठी आहे. ही आकडेवारी एक लाखापेक्षाही जास्त असल्याचे सांगण्यात येते. सातारा जिल्ह्यात मुंबई, पुणे आदी शहरातून आलेल्या लोकांमध्ये सर्वाधिक लोक हे एकट्या पाटण तालुक्यात आले. त्यामुळे, पाटण, मुंबई व पुणे येथून आलेल्या नोकरदार, माथाडी, मजूरांमुळे स्थानिकांमध्ये याची मोठ्या प्रमाणावर लागण होईल अशी भीती व शक्यता सर्वच पातळ्यांवर व्यक्त केली गेली होती.
त्याचवेळी प्रशासनानेही संभाव्य धोका लक्षात घेऊन अधिकाधिक कडक उपाययोजना, खबरदारी घेऊन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने उप विभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, स.पो.नि. तृप्ती सोनवने आदी मान्यवर अधिकारी व कर्मचारी यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. दरम्यान डेरवण येथील त्या १० महिन्याच्या बालकाचे सर्व चाचणी अहवाल आता निगेटिव्ह आले असून त्याच्यावर कृष्णा रुग्णालय कराड येथे उपचार करून आता तालुका आरोग्य विभागाकडून घरी सोडण्यात आले आहे. तर, त्याच बालकाच्या कुटुबियांच्या संपर्कात आलेल्या २२ लोकांना तूर्तास पाटण कोरोना केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले असून आता त्यांचीही क्वारंटाईन मुदत संपत आल्याने गुरुवारी या सर्वांचे स्वॅब नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
या सर्वांचे नमुने अहवाल निगेटिव्ह यावेत अशा अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले तर त्या सर्वांनाच घरी सोडण्यात येणार आहे. त्या सर्वांनीच घरी स्वतःची काळजी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान पाटण येथील मिल्ट्री वसतीगृहात आता केवळ दोघांनाच ठेवण्यात आले असल्याचीही माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.