सांगली - कोरोनाबाबत जगाचे धोरण मांडणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी जगाचा जास्त अभ्यास केला आहे, अशी उपरोधीक टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. तसेच नरेंद्र मोदींकडून राज्य सरकारला फार मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे त्यांनी जाहीर केलेल्या पॅकेजमधून आम्हाला 'फुल ना फुलाची'पाकळी येईल, असे वाटत होते. मात्र, अद्याप हाती काही आलेले नाही, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली. सांगलीतील विटा येथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
फडणवीसांनी केला जगाचा अभ्यास -
केंद्र सरकारकडून जीएसटीची रक्कम यायला उशीर होत आहे. पैशांअभावी राज्यात देखील काही प्रश्न तयार झाले आहेत, असे स्पष्ट करत जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. फडणवीसांनी जगाचा चांगला अभ्यास केलेला दिसतो. परदेशातील लॉकडाऊन आणि राबवलेली धोरणे याचे त्यांनी वारेमाप कौतुक केले आहे. पण, त्यांनी त्यात भारताचा उल्लेख केलेला नाही. भारताचा उल्लेख न केल्यामुळे मला थोडी त्यांच्या अभ्यासावर शंका आहे. त्यांना असे वाटत असावे की, परदेशात जशी धोरणे राबवण्यात आली, तशी भारतात राबवली गेली नाहीत. अशी उपरोधक टीका जयंत पाटील यांनी फडणवीसांवर केली.
काय म्हणाले होते फडणवीस -
मुख्यमंत्र्यांनी आपल्या संबोधनात जगात कुठे कुठे किती किती वेळा लॉकडाऊन केला याची माहिती दिली. मात्र, फडणवीसांनी त्याठिकाणी लॉकडाऊन करताना त्या-त्या सरकारांनी काय पर्यायी उपाययोजना केल्या याची यादीच सादर केली आहे. शिवाय तुलना केवळ परिस्थितीशी नको, सरकारच्या कृतीशीही व्हावी, एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे, असे फडणवीस यांनी म्हटले होते. विरोधक किंवा तज्ञांचा दु:स्वास करून नाही, तर आपण प्रत्यक्ष काय करतो, याचे विवेचन कोरोना थांबवण्यात अधिक मदत करेल, असा खोचक सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला होता.
हेही वाचा - "गेल्या वर्षभरापासून आम्ही बाहेर रस्त्यावरच आहोत" फडणवीसांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला