सागंली - चांदोली धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. यामुळे धरणातून शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान 12260 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात करण्यात आला. मागील पाच-सहा दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातून विसर्ग कमी करून 2 हजार 500 इतका सुरू होता.
दोन दिवसापासून चांदोलीसह सर्वत्र पावसाचा जोर वाढला असल्याने शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान 12 हजार 260 क्युसेक विसर्ग वारणा नदीत सोडण्यात आला. धरणातून पाणी सोडले असल्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वारणा पाटबंधारे शाखा अधिकारी टी. एम. धामणकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. शिराळा तालुक्याबरोबर वाळवा तालुक्यातही दोन- तीन दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. यामुळे छोटे मोठे बंधारे पाण्याखाली गेले असून कृष्णा व वारणा नद्या दुधडी भरून वाहत आहेत.