सांगली - जिल्ह्यात सतत होणाऱ्या पावसामुळे सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. एका दिवसात तब्बल 13 फुटांची वाढ कृष्णाच्या पाणी पातळीमध्ये झाली आहे. तर, दुसऱ्या बाजूला चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी कायम आहे. ( Water Level Of Krishna River Increased ) त्यामुळे धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून 9 हजार 400 क्युसेकस पाण्याचा विसर्ग वारणा नदीपत्रात करण्यात येत आहे. त्यामुळे वारणा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी - सांगलीमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागलेली आहे. सांगलीतील आयुर्विन पूल याठिकाणी मंगळवारी सकाळी दहा फुटांवर असणारी पाण्याची पातळी आता 23 फुटांवर जाऊन पोहोचली आहे. कृष्णेची इशारा पातळी ही 40 तर धोका पातळी 45 फूट आहे. तर, दुसऱ्या बाजूला शिराळा तालुक्यात देखील मुसळधार पाऊसा कायम आहे. चांदोली धरण पांणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम आहे. सलग तिसऱ्या दिवशी चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाली असून गेल्या 24 तासांमध्ये या ठिकाणी 138 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
नदी काठच्या गावांनी सतर्कतेच्या सुचना - 34.40 टीएमसी येथे पाणी साठवून क्षमता असणाऱ्या धरणामध्ये आता 31.05 टीएमसी इतक्या पाणीसाठा निर्माण झालेला आहे त्यामुळे धरण 91% भरले आहे. गेल्या दोन दिवसांपासून चांदोली धरणातून वारणा नदी पत्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. आता हा विसर्ग हळूहळू वाढविण्यात येत आहे. मंगळवारी सकाळपासून चांदोली धरणातून 9 हजार 400 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे, त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत देखील झपाट्याने वाढ झाली असून वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे. यापार्श्वभूमीवर वारणा नदी काठच्या गावांनी सतर्क राहावे, अशा सूचना धरण प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - डॉ. पी वरवरा राव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर; वाचा, कोण आहेत वरवरा राव