सांगली : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर ( Vishnudas Bhave Award Announced ) झाला आहे. जेष्ठ नाटककार, अभिनेते, पटकथा लेखक, दिग्दर्शक सतिश आळेकर यांना यंदाचा विष्णूदास भावे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 5 नोव्हेंबर रंगभूमिदिनी जेष्ठ दिग्दर्शक, रंगकर्मी डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर सांगलीच्यावतीने ( Akhil Maharashtra Natya Vidyamandir Sangli ) गेल्या 54 वर्षा पासून नाटय क्षेत्रातील कलाकारांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदाचे हे 55वे वर्ष आहे.
काय आहे विष्णूदास भावे पुरस्कार : विष्णूदास भावे पुरस्कार विष्णूदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीने प्रदान केलेला पुरस्कार आहे. इ.स. १९५९ मध्ये बालगंधर्वांना सर्वप्रथम हा पुरस्कार देण्यात आला. विष्णुदास भावे गौरव पदक, 25 हजार रोख रुपये, शाल श्रीफक असे, या पुरस्काराचे स्वरूप आहे.
नाटककार सतिश आळेकर : आळेकरांचे नाव नाटककार म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार यांच्या जोडीने घेतले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाटक अनुवाद प्रकल्पासाठी त्यांनी काम केले आहे. प्ले-राइट्स डेव्हलपमेन्ट स्कीम आणि रीजनल थिएटर ग्रुप डेव्हलपमेन्ट या प्रकल्पांसाठी त्यांना फोर्ड फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. अमेरिका, इंग्लंड, ग्रीस, जर्मनी आदी अनेक देशांत त्यांनी रंगभूमीविषयक अध्यापन, कार्यशाळा आणि संशोधन प्रकल्पांवर काम केले आहे. पुण्याच्या ललित कला केंद्राचे ते दीर्घकाळ संचालकही होते.
आत्तापर्यंत आळेकरांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान :
- अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार (जून २०१२)
- अतुल पेठे यांनी 'नाटककार सतीश आळेकर' नावाचा लघुपट बनवला आहे.
- एनसीपीएच्या ‘प्रतिबिंब’ नाट्यमहोत्सवात करण्यात आलेला विशेष सन्मान (जुलै २०१२)
- एशियन कल्चरल कौन्सिल(न्यू यॉर्क)चा सन्मान
- तन्वीर सन्मान (९-१२-२०१७)
- नांदीकार सन्मान
- पद्मश्री पुरस्कार : इ.स. २०१२ [१]
- द फर्ग्युसोनियन्स या संस्थेचा फर्ग्युसन अभिमान पुरस्कार
- फुलब्राईट शिष्यवृत्ती
- फोर्ड फाऊंडेशनची शिष्यवृत्ती
- बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाऊंडेशनचा बलराज साहनी पुरस्कार
- संगीत नाटक अकादमी सन्मान
- सर्वोत्कर्ष चॅरिटेबल ट्रस्टतर्फे स्वरसन्मान पुरस्कार