सांगली : देशात लवकरच ध्वनी प्रदूषणाबाबत नवा कायदा ( New Noise Pollution Act ) आणला जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी दिली आहे. वाहनांना कर्कश्श हॉर्न ऐवजी पारंपारिक वाद्यांचा आवाजातील हॉर्न ( Traditional Musical Horn ) बसवण्याबाबत हा कायदा लवकरच केला जाणार असल्याचे मंत्री नितीन गडकरी ( Minister Nitin Gadkari ) यांनी स्पष्ट केले आहे. सांगली येथे पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ पेढीच्या 190 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित समारंभात ते बोलत होते.
एक तासाची प्रकट मुलाखत : सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि जव्हेरी पेढीचा 190 वा वर्धापनदिन केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीत पार पडला. त्यानिमित्ताने मंत्री नितिन गडकरी यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती. प्रसिद्ध अभिनेते राहुल देशपांडे यांनी एक तासाची प्रकट मुलाखत घेतली. त्यामध्ये अनेक पैलूंचा नितिन गडकरी यांनी उलगडा केला.
ध्वनी प्रदूषण बाबत नवा कायदा : यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, आपल्या देशात पाणी, वायू आणि ध्वनी प्रदूषण ही समस्या बनली आहे. त्यामुळे केंद्रीय जलसंपदा खात्याच्या माध्यमातून देशातील पाण्याचे प्रदूषण कमी करण्याचे काम केलं. त्यानंतर देशात उत्कृष्ट रस्ते आणि पूल निर्माण करण्याचे कामही सुरू आहे. याठिकाणी वायु प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत. पुढचा भाग म्हणून वाहनांच्या माध्यमातून होणारे ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांच्या कर्कश हॉर्नसाठी नवा कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्कश आवाजाऐवजी पारंपारिक बासुरी, माऊथ ऑर्गन, बिगुल अशा वाद्यांचा आवाज असणार आहे. लवकरच हा कायदा होणार असल्याची माहिती प्रकट मुलाखत दरम्यान मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
रस्ते निर्माणसाठी सामान्यांची गुंतवणूक आणि परतावा : तसेच देशात राष्ट्रीय महामार्ग निर्माण करताना बॉण्डच्या माध्यमातून सर्वसामान्यांकडून गुंतवणूक करून महिना 7 टक्के व्याज देण्याचं धोरण बनवले आहे. त्यासाठी सेबीकडे परावनगी देखील मागितली आहे. ज्यामुळे सर्व सामन्या जनतेला फिक्स डिपॉझिटचा चांगला परतावा नक्क्की मिळेल, असा मानस यावेळी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.