सांगली - मान्सूनच्या आगमानाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असताना चिंता वाढविणारा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या 'वायू' चक्री वादळाचा राज्यातील मान्सूनवर परिणाम होणार आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठावाडयातील मान्सून लांबणीवर जाणार असल्याचा अंदाज पर्यावरण आणि हवामान अभ्यासक राहुल पाटील यांनी व्यक्त केला. या कालावधीत तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
चक्री वादळ हे कोकण आणि गुजरातच्या किनारपट्टीवर १४ -१५ जूनपर्यंत परिणाम करणार असल्याचा अंदाजही पाटील यांनी व्यक्त केला आहे.
दुष्काळामुळे आवश्यकता असलेल्या ठिकाणी वादळाचा प्रतिकूल परिणाम -
अरबी समुद्रातील मौसमी नैऋत्य वारे हे सध्या निर्माण झालेल्या चक्रीवादळाने अडले आहे.यामुळे वेळात दाखल होणार मान्सून अजून दाखल होऊ शकला नाही. मात्र चक्रीवादळामुळे सह्याद्री पट्ट्यात म्हणजेच तळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रमध्ये पाऊस पडणार आहे. दुष्काळामुळे आवश्यकता असलेल्या ठिकाणी वादळाचा प्रतिकूल परिणाम राहणार आहे. मान्सून लांबणीवर गेल्याने विदर्भ आणि मराठावाडा कोरडा राहणार आहे. तसेच नियोजित वेळेपेक्षा याठिकाणी मान्सून दाखल होण्यासही आणखी विलंब लागणार आहे.
चक्रीवादळ १४ जून नंतर पुढे सरकल्यावरच अरबी समुद्रातील मौसमी नैऋत्य वाऱ्यांच्या स्थितीवर पुढील मान्सूनची वाटचाल कळू शकणार असल्याचा अंदाज पाटील यांनी व्यक्त केला आहे.