सांगली - पुणे-बंगळुरू महामार्गावर वाळवा तालुक्यातील नेर्ले येथे सुमो गाडीचा टायर फुटून अपघात झाला. या अपघातात गाडीचा चालक श्रीकांत आण्णापा कुंभार (वय ५०, रा.अंकली ता.मिरज) व स्वप्नाली प्रमोद कुंभार (वय ३२, रा.इचलकरंजी, ता.हातकणंगले) हे दोघे ठार झाले तर, अन्य नऊ जण जखमी झाले. हे सर्वजण पुणे येथे मुलगी पाहण्यासाठी जात असताना शुक्रवारी हा अपघात घडला.
गाडीचा फुटला टायर -
मिरज तालुक्यातील अंकली येथील एकाच कुटुंबातील ११ लोक मुलगी पाहण्यासाठी सुमो गाडीने महामार्गावरून पुण्याच्या दिशेने जात होते. सकाळी साडे आठच्या सुमारास नेर्ले येथील हॉटेल दत्त भुवन समोर रस्त्यावर गाडीचा टायर फुटला. त्यानंतर गाडी महामार्गा शेजारील ओढ्यात जाऊन पलटी झाली. अपघात घडताच स्थानिक लोकांनी जखमींना गाडीतून बाहेर काढत इस्लामपूर येथील खासगी दवाखान्यात दाखल केले.
अपघातामध्ये गाडी चालक श्रीकांत कुंभार व स्वप्नाली कुंभार हे दोघे ठार झाले. तर पंकज सुनिल कुंभार (वय२९), सुरेखा सुनिलकुंभार (वय ४२), सुनिल मल्लापा कुंभार (वय ५२), प्रकाश मल्लापा कुंभार (वय ४०), अरुण मल्लापा कुंभार (वय ४०), गीतांजली अरुण कुंभार (वय ३८), निलम श्रीकांत कुंभार (वय ३६) सर्व रा.कुंभार गल्ली, अंकली ता.मिरज), मयूर प्रमोद कुंभार (१२, रा. इचलकरंजी ता. हातकणंगले) व सदाशिव मारुती कुंभार (५६ रा.बेडग्याहळ ता.चिक्कोडी) हे जखमी झाले आहेत.