सांगली - भिंत कोसळून अंगणात झोपलेल्या माय-लेकींसह तीन महिला ठार झाल्या. ही घटना खानापूर तालुक्यातील मोही येथे बुधवारी सकाळी घडली. या घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली आहे. हौसाबाई खंदारे, सोनाबाई खंदारे, कमल जाधव असे त्या ठार झालेल्या महिलांची नावे आहेत. तर सावित्री तुळशीराम हसबे ही महिला गंभीर जखमी झाली आहे.
हौसाबाई, सोनाबाई, कमल आणि सावित्री या महिला मंगळवारी रात्री अंगणात झोपल्या होत्या. मात्र बुधवारी सकाळी घराची संरक्षक भिंत या महिलांच्या अंगावर पडली. यामध्ये हौसाबाई खंदारे ( वय ८० ), सोनाबाई खंदारे ( वय ४०), कमल जाधव ( वय ५० ) या भिंतीच्या मलब्याखाली दबून जागीच ठार झाल्या. तर सावित्रीबाई ( वय ४५ )या गंभीर जखमी झाल्या. त्यांना खानापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
![Wall](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/2742819_764_a28fbc8b-7b7c-4da2-b98f-6758d92eed52.png)
दरम्यान भिंत कोसळून ३ महिला ठार झाल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे घटनास्थळी एकच गर्दी झाली. माय-लेकींसह ३ महिला ठार झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.