सांगली - दुचाकी आडवी मारल्याच्या रागातून गेल्या आठवड्यात साळशिंगे (ता.खानापूर) येथील मोबाईल शॉपी मालकाची हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी इचलकरंजी पोलिसांनी तपास करून तीन संशयितांना अटक केली आहे. ओंकार उर्फ मुरली दशरथ गेजगे (21, रा. साईनगर, शहापूर, इचलकरंजी) याच्यासह सागर रामचंद्र ऐवळे (19), रोहन उर्फ चिक्या बापूराव रावताळे (21, दोघे रा. घानवड, ता.खानापूर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, सागर भेंडवडे येथील बालाजी करांडे यांची विटा येथील खानापूर रोडला साई मोबाईल शॉपी आहे. ६ नोव्हेंबरला त्यांचा साळशिंगे येथे धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही हत्या अपघात दाखविण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांपुढे तपास करण्याचे मोठे आव्हान होते. विटा पोलिसांना या हत्येचे धागेदोरे मिळत नव्हते. अतिरिक्त पोलिस अधिक्षक मनिषा डुबुले यांनी घटनास्थळी भेट दिली होती. तसेच पोलिसांना तपासाबाबत सुचना दिल्या होत्या. तपासात खूनाचे इचलकरंजी कनेक्शन असल्याची माहिती इचलकरंजी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक एन. एच. फरास यांना मिळाली होती.
हेही वाचा - उस्मानाबादमध्ये डोळ्यात मिरची पूड टाकून दोन लाख लुटणाऱ्या 6 आरोपींना अटक
त्यानुसार मोबाईल लोकेशनच्या आधारे संशयित आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. विटा आणि घानवड परिसरातून ओंकार गेजगे, सागर ऐवळे आणि रोहन रावताळे या तीनही संशयितांना मंगळवारी रात्री इचलकरंजी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. इचलकरंजीतील शहापूर परिसरात राहणारा ओंकार गेजगे याची आत्या लक्ष्मी शंकर जावीर ही घानवड येथे राहण्यास आहे. त्यातूनच त्याची सागर ऐवळे आणि रोहन रावताळे याच्याशी ओळख झाली.
हेही वाचा - पोलिसांचा खबरीच निघाला अमली पदार्थांचा तस्कर
हत्येच्या दिवशी तीनही संशयित विटा-साळशिंगे रस्त्यावर असलेल्या शिवतारा ढाब्यावर जेवणासाठी दुचाकीवरून निघाले होते. त्याचवेळी बालाजी करांडे हे देखील आपल्या दुचाकीवरून घरी परतत होते. बालाजी करांडे यांनी दुचाकी आडवी मारल्याचा राग आल्याने संशयित आरोपींनी बालाजी करांडे यांचा पाठलाग करून त्यांना साळशिंगे फाटा परिसरात गाठले. त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये वादावादी झाली. यावेळी सागर आणि अन्य दोघांनी बालाजी यांना मारहाण केली. ओंकार गेजगे याने चाकूने त्याच्या छातीत वार केला. यामध्ये बालाजी करांडे जागीच कोसळले. दुचाकीवरून त्याला ढकलून दिल्याने प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचा समज तेथील नागरिकांचा झाला. बालाजी करांडे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालानंतर त्यांचा खून झाला असल्याचे समोर आले होते.
हेही वाचा - साताऱ्याजवळ परप्रांतीय कामगाराचा खून
या घटनेनंतर विटा पोलीस संशयित आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान, संशयित शहापूर परिसरातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने हालचाली करीत तीनही संशयितांना ताब्यात घेवून त्यांना विटा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. प्रथमदर्शनी हा खून दुचाकी आडवी मारल्याच्या कारणावरुन झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या हत्येप्रकरणी संशयित आरोपी म्हणून ओंकार उर्फ मुरली गेजगे, सागर ऐवळे, रोहन उर्फ चिक्या रावताळे या तिघांना विटा पोलिसांनी अटक केली आहे.