सांगली - ऐन सणासुदीच्या काळात सांगलीमध्ये वीज वितरण कंपनीच्या हाय व्होल्टेजचा झटका सांगलीकर नागरिकांना बसला आहे. विजेच्या उच्च दाबामुळे टीव्ही, फ्रीज असे हजारो विद्युत उपकरणे जळून खाक झाली आहेत. त्यामुळे नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वीज वितरण कंपनीकडून नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.
उच्च दाबामुळे विद्युत उपकरणे जळून खाक
देशात सध्या विजेचे संकट निर्माण झाले आहे. मात्र सांगलीमध्ये ऐन सणासुदीच्या काळात वीज वितरण कंपनीच्या झटक्याने ग्राहक मोठ्या संकटात सापडले आहेत. सांगलीच्या गणेशनगरमध्ये वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. दुपारच्या सुमारास अचानक विजेचा दाब वाढला, त्यामुळे शेकडो घरातील टीव्ही, फ्रीज, मोबाइल अशी विद्युत उपकरणे जळून खाक झाली आहेत.
500 ते 600 ग्राहकांना फटका
अचानक एकाच वेळी तब्बल 500 ते 600 ग्राहकांना याचा फटका बसला आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, वीज वितरण विभागाकडून नुकसान झालेल्या ग्राहकांचे पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.