सांगली - सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने घरफोडी करणाऱ्या एका टोळीला अटक केली आहे. या प्रकरणी चौघांना अटक करत त्यांच्याकडून 10 घरफोडीच्या घटनेतील चोरलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 3 लाख 63 हजारांचा मुद्दे्माल जप्त केला आहे.
घरफोडीचे 10 गुन्हे उघडकीस -
सांगली महापालिका क्षेत्रात घरफोडी करून चोरी करणाऱ्या एका टोळीला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून अतिरेकी उर्फ आकाश श्रीकांत खांडेकर (22, रा. राणाप्रताप चौक सांगलीवाडी), अक्षय धनंजय पोतदार (20, रा. पाण्याच्या टाकीजवळ, मालगाव रोड, सुभाषनगर मिरज), विजय संजय पोतदार (23, रा. रामकृष्णनगर, इगल लाईट हाऊसजवळ, कुपवाड) आणि रोहित गणेश कोळी (20, रा. हरीपूर रोड, विनायक पार्क, साईमंदिराजवळ सांगली), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या चारही आरोपींनी गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत या दहा घरफोड्या केल्या आहेत.
या टोळीने सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल तसेच इतक भांडी व रोख रक्कम चोरी केली होती. दरम्यान सांगली शहरातील आकाशवाणी मागील असणाऱ्या काळीवाट याठिकाणी चार जण दंगा करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन या चौघांना ताब्यात घेतले. त्यावेळी पैश्याच्या वादातून भांडण सुरू असल्याचे प्राथमिक निदर्शनास आले. यानंतर त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनी सांगली शहरात गेल्या 3 महिन्यांत चौघांनी मिळून 10 ठिकाणी घरफोडी करत सोन्या-चांदीचे दागिने, भांडी आणि रोख रक्कम चोरल्याची कबुली दिली. त्यांनतर त्यांच्याकडून घरफोडीतील तीन लाख 63 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दिली आहे.