सांगली - पलूस तालुक्यातील 2 टोळयांना एक वर्षासाठी सांगली सह 3 जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. रानमाळे टोळीच्या 9 जणांना तडीपार करण्यात आले आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने भावकीतील या टोळीवर ही कारवाई करण्यात आली.
भावकी असणार्या दोन्ही टोळीवर कारवाई -
पलूस तालुक्यातील बुर्ली येथे रानमाळे भावकीमध्ये शेतजमिनीचा गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. यातून रानमाळे भावकीमध्ये अनेक मारामारीच्या घटना घडल्या होत्या. अशोक रानमाळे आणि राजाराम रानमाळे या भावकीत हा वाद आहे. यातून दोन्ही गटाच्या नऊ जणांच्या विरोधात पलूस पोलिस ठाण्यामध्ये सन २०१४ ते २०२० दरम्यान शेतजमीन वहिवाटीचे, हदीचे कारणावरुन बेकायदेशीर जमाव जमवुन, घातक शस्त्राने दुखापत पोहचवणे, मारहाण, शिविगाळ, जिवे मारण्याची धमकी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही गटातील नऊ जणांच्या विरोधात पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्याकडे पाठवला होता. त्यानुसार पोलिस अधीक्षक गेडाम यांनी रानमाळे गटाच्या दोन्ही टोळीवर तडीपारीची कारवाई केली आहे.
दोन्ही गटाचे नऊ जण हद्दपार -
यामध्ये राजाराम कुंडलीक रानमाळे, गजानन तानाजी रानमाळे, बबन मारुती रानमाळे, अभिजित राजाराम रानमाळे, आणि अशोक रानमाळे, रणजित रानमाळे, अभिजित पाटील, रावसाहेब रानमाळे आणि विश्वजित रानमाळे या 9 जणांना कारवाई करण्यात आली आहे. सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्हयातुन 1 वर्षासाठी तडीपारी करण्यात आले आहे.