सांगली- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना, नागरिक मात्र घराच्या बाहेर पडण्यात अतिउत्साह दाखवित आहेत. शासनाने नागरिकांना घरात राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तरीही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. नागरिकांना समजून सांगण्याचे सर्व पर्याय संपले असल्याने आता प्रतिकात्मक कोरोना बनून कोरोना बाबात जनजागृती केली जात आहे.
हेही वाचा- Coronavirus : राज्य मंत्रिमंडळाची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक, लॉकडाऊन वाढण्याची शक्यता
सांगलीच्या एका अवलियाने कोरोना जनजागृतीसाठी अनोख्या पद्धतीने प्रचार मोहीम सुरू केली आहे. कोरोनारुपी अवतार धारण करुन नागरिकांमध्ये कोरोनाबाबत जागृती सुरू केली आहे. विजय जाधव असे या सामजिक कार्यकर्त्याचे नाव असून कोरोना रुपी वेशभूषा करुन नियम पाळा, कोरोना टाळा असा संदेश तो देत आहे.
कोरोना विषाणू हा संसर्गजन्य असल्यामुळे त्याच्यावर प्रतिबंध करण्यासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी घरात राहण्याचा सल्लाही सरकारकडून देण्यात आलेला आहे. मात्र, नागरिक या ना त्या कारणाने घराच्या बाहेर पडत आहेत. या सर्व नागरिकांना घरी पाठविण्यासाठी पोलिसांनी सर्व प्रयत्न केले आहेत. तरीही नागरिक कुठल्याच प्रकारचे आदेश ऐकण्यास तयार नसल्याने नागरिकांची रस्त्यावरील संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
त्यामुळे सांगलीच्या इस्लामपूरच्या साखराळे येथील सामजिक कार्यकर्ते विजय जाधव रस्त्यावर कोरोना रुपात अवतारुन जनजागृती करत आहे. 'नियम पाळा- कोरोना टाळा' असा संदेशही ते देत आहेत.