सांगली - केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन पुकारण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विधेयकाचा अध्यादेश फाडून शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला.
केंद्र सरकारने कृषी विधेयक अध्यादेश मंजूर केले. यानंतर देशभरात प्रतिक्रिया उमटल्या. कृषि विधेयकाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केला आहे. केंद्र सरकारच्या या विधेयकाविरोधात देशभर विविध संघटनांनी आंदोलनाची हाक दिली. तसेच आज देशव्यापी 'भारत बंद' आंदोलन पुकारण्यात आले. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निदर्शने करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले. या वेळी कृषी विधेयक अध्यादेश फाडून शेतकरी संघटनेने निषेध नोंदवला. केंद्र सरकारने पारित केलेल्या अध्यादेशात अनेक जाचक अटी असून, ते शेतकऱ्यांवर अन्याय करणारे असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मांडले. त्यामुळे हे विधायक शेतकऱ्यांच्या हिताचे नाही, असे संघटनेने म्हटले.
केंद्र सरकारने तातडीने हे अध्यादेश रद्द करावेत. अन्यथा यापुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.