सांगली - दिल्लीतील शेतकरी आंदोलकांनी ट्रॅक्टर रॅलीची जोरदार तयारी दर्शविली आहे. या रॅलीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला आहे. कृषी कायद्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर रॅली काढली. केंद्र सरकारच्या विरोधात प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर बळीराज्याचे फौजांचे संचलन असल्याचा एल्गार करत राजू शेट्टींनी केंद्र सरकारला यावेळी गर्भित इशारा दिला आहे.
केंद्र सरकारच्या नवी कृषी कायद्याविरोधात उद्या पार पडणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर काढण्यात आली. शहरातील विश्रामबाग चौक येथून क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्याला राजू शेट्टी यांनी अभिवादन करत ट्रॅक्टर मोर्चाची सुरुवात केली. शेट्टी यांनी यावेळी स्वतः ट्रॅक्टर चालवत बळीराजाच्या फौजांचे संचलन केले आहे. सांगली शहरातील प्रमुख मार्गावरून ही ट्रॅक्टर रॅली निघाली. या रॅलीत सुमारे पन्नासहून अधिक ट्रॅक्टर घेऊन स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
हेही वाचा-कष्ट करून सर्वांचे पोट भरतो, पण सरकारला दयामाया नाही! आदिवासी महिला शेतकऱ्यांची व्यथा
अन्यथा दिल्लीकडे कूच करू...
राजू शेट्टी म्हणाले की, उद्या (26 जानेवारी) देशाच्या सैन्यदलाचे संचलन दिल्लीमध्ये पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर संचलन आयोजित करण्यात आले आहे. मात्र, दक्षिणेतल्या शेतकऱ्यांना दिल्लीकडे जाण्यात सरकारकडून मज्जाव करण्यात आलेला आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर सांगली-कोल्हापूरमध्ये केंद्र सरकारला इशारा देण्यासाठी ट्रॅक्टर मार्च काढला आहे. आज शेतकरी शांततेने ट्रॅक्टर रॅलीचे संचलन करत आहेत. मात्र, सरकारला आमचा गर्भित इशारा की, जर 3 कृषी कायदे कायमचे रद्द झाले नाही तर, शेतकरी कधीही दिल्लीला कूच करू शकतो.
दरम्यान, राज्यभरात शेतकऱ्यांनी जिल्ह्याच्या विविध ठिकाणी ट्रॅक्टर रॅली काढली आहे.
दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांनी सरकारला दिला आहे इशारा-
नवीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. २६ जानेवारीपर्यंत आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर दिल्लीपर्यंत ट्रॅक्टर रॅली आयोजित करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्यावतीने या रॅलीची जोरदार तयारी झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांना स्थगिती दिली असली, तरीही आमची मागणी कायदे रद्द करण्याची आहे, असे म्हणत शेतकरी संघटनांनी आपले आंदोलन सुरुच ठेवले आहे.
हेही वाचा-शेतकर्यांचे आंदोलन सुरू ठेवून प्रजासत्ताक दिनी देश अशांत ठेवायचाय का?