सांगली - येत्या चार दिवसात थकीत ऊस बिल न मिळाल्यास खासदार संजय पाटील यांच्या घरासमोर आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. तासगावमध्ये स्वाभिमानीकडून रास्ता रोको आंदोलन करत ऊस बिलाची रक्कम तातडीने जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
खासदारांविरोधात आंदोलन
भाजपाचे खासदार संजय पाटील यांच्या तासगाव आणि नागेवाडीच्या यशवंत साखर कारखान्याकडून जानेवारी महिन्यापासून गाळप झालेल्या उसाची बिल अद्यापही शेतकऱ्यांना देण्यात आले नाहीत. आधीच कोरोनाच्या परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत असताना, खासदार संजय पाटील यांच्या कारखान्याकडून सहा महिन्यांपासून थकवण्यात आलेल्या बिलांमुळे ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे ही बिले तातडीने मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पाटील यांच्या कारखान्याविरोधात आंदोलन करण्यात आले.
अन्यथा खासदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली तासगाव याठिकाणी ऊस बिलांच्या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला. शहरातील चिंचणी नाका या ठिकाणी शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता. त्यानंतर खासदार संजय पाटील आणि कारखान्याचे संचालक आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी शुक्रवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याचे आश्वासन खासदार संजयकाका पाटील यांच्याकडून देण्यात आले. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले आंदोलन स्थगित केले. मात्र येत्या चार दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग झाले नाही, तर या पुढील आंदोलन खासदार संजय पाटील यांच्या घरासमोर करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.