सांगली : कोडोली येथील माय-लेकीने चिकुर्डे येथील वारणा नदी पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली. रेश्मा अमोल पारगावकर (वय 36 वर्षे) आणि ऋता अमोल पारगावकर (वय 13 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या माय-लेकीची नावे आहेत. सुसाईट नोट लिहून 24 ऑगस्टच्या रात्री साडेअकरा वाजता आत्महत्या केली. आई रेश्मा हिचा मृतदेह काल (25 ऑगस्ट) सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ऐतवडे खुर्द येथील वारणा पुलाजवळ नदीत सापडला. तर 4 वाजण्याच्या सुमारास पुलाच्या 300 मिटर अंतरावर मुलगी ऋताचा मृतदेह सापडला.
सामाजिक कार्यकर्त्याला दिसल्या होत्या रात्री नदीवर
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (25 ऑगस्ट) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ऐतवडे खुर्द येथे नदीवर माळ्याची मळी येथे नदी पात्रामध्ये एका 36 वर्षीय महिलेचा मृतदेह पाण्यात मयत अवस्थेत तरंगताना ग्रामस्थांना दिसून आला. यावर पोलीस पाटील मोहन नामदेव चांदणे यांनी घटनास्थळी भेट देऊन कुरळप पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी घटना स्थळी भेट देऊन मृतदेह बाहेर काढला. चिकुर्डे येथील सामाजिक कार्यकर्ते शहाजी भोसले यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, रात्री साडेअकरा वाजता या मायलेकी चिकुर्डे वारणा नदीच्या पुलावर बसल्या होत्या. त्यामुळे भोसले यांनी दोघींना का बसला आहे? असे विचारले. तर, आम्ही धार्मिक विधीसाठी थांबल्याचे माय-लेकींनी सांगितले. नंतर भोसले यांना त्या ठिकाणी एक लिहिलेला कागद व मोबाईल सापडला. याची माहिती भोसले यांनी कुरळप पोलीस स्टेशनला दिली. यावरून या दोघी कोडोली (ता. पन्हाळा जि. कोल्हापूर) येथील असल्याचे समजले.
काय म्हटलंय सुसाईड नोटमध्ये?
'माझा नवरा दारूच्या नशेने मृत्यू पावला आहे. त्यामुळे मला कोणीही वारस नाही. शिवाय मला स्वतःचे मुल नाही. त्यामुळे मी तीन महिन्याची मुलगी दत्तक घेतली होती. मात्र ती सुद्धा पाच महिन्यांनी मतिमंद असल्याचे समजले. ती मधुमेह आजाराने त्रस्त असल्याने आम्ही दोघी नैराश्यातून आत्महत्या करत आहोत' असे त्या सुसाईड नोटमध्ये लिहिल्याचे आढळले. दरम्यान, पोलिसांनी ती चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. काल दिवसभर कोल्हापूर येथील रेस्क्यू टीमला बोलावून बोटीच्या माध्यमातून पोलिसांनी मुलीचा शोध घेतला. अखेर चार वाजता ऐतवडे खुर्द वारणा नदी पुलाच्या तीनशे मिटर अंतरावर मुलीचा मृतदेह आढळून आला. दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखील एएसआय गजानन पोतदार तपास करत आहेत.
हेही वाचा - कृषीतज्ञ, पद्मश्री बी. व्ही. निंबकर यांचे निधन