सांगली - जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केलेले वाळवा तालुक्यातील पडवळवाडीचे सुपूत्र, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांचा राज्याचे जलसंपदा मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूर राजाराम नगर येथे यथोचित सन्मान केला. "जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे पार करून आपण वाळवा तालुका, सांगली जिल्ह्याचा नावलौकि वाढविला आहे. आम्हास आपला सार्थ अभिमान आहे, अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली. याप्रसंगी युवा नेते प्रतिकदादा पाटील, पडवळवाडीचे माजी सरपंच सुधीर नांगरे उपस्थित होते.
जयंत पाटील यांनी संभाजी गुरव यांचे त्यांच्या धाडसी कामगिरीबद्दल अभिनंदन करताना तोंडभरून कौतुकही केले. यावेळी तयारी कशी केली, एव्हरेस्ट शिखर सर करताना कोणत्या अडचणी आल्या? आदी माहितीही त्यांनी घेतली. गुरव यांनी एव्हरेस्ट शिखर करताना आलेल्या अडचणी तसेच हे शिखर सर करताना काय घडते? हे सांगत असताना पाटील यांच्यासह उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभा राहत होता.
दोन वर्षांपासून एव्हरेस्ट शिखर चढाई साठी तयारी केली
संभाजी गुरव हे सध्या नवी मुंबई येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत आहेत. त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून एव्हरेस्ट शिखर चढाई साठी तयारी केली आहे. गेल्या रविवारी त्यांनी एव्हरेस्ट शिखरावर भारत देशाचा तिरंगा ध्वज फडकविला. ८ हजार ८४८ मीटर इतकी एव्हरेस्ट शिखरांची उंची आहे.
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले एव्हरेस्टवीर
पहिल्याच प्रयत्नात एव्हरेस्ट शिखर सर करणारे ते पहिले मराठी पोलीस अधिकारी तसेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले एव्हरेस्टवीर ठरले आहेत. त्यांनी गडचिरोली येथे कार्यरत असताना केलेल्या धाडसी कामगिरी बद्दल त्यांना २०१४ मध्ये राष्ट्रपती पदकाने सन्मानित केले आहे. २०१५ मध्ये विशेष सेवा पदक, २०१८ मध्ये आंतरिक सेवा पदक आणि महा संचालकांच्या विशेष पदकाचेही ते मानकरी आहेत.
याप्रसंगी युवक राष्ट्रवादीचे पडवळवाडी अध्यक्ष विशाल कोकाटे, पृथ्वीराज कोकाटे, अभिषेक खोत, चंद्रकांत कोकाटे ही उपस्थित होते.