सांगली - सांगलीत एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आक्रमक झाले आहे. पहाटेपासून कर्मचार्यांनी संप पुकारत एसटी सेवा बंद पाडली आहे. तरीही काही बसेस प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांनी आक्रमक होऊन रस्त्यावर ठिय्या मारत बस वाहतूक रोखून धरली. त्यामुळे कर्मचारी आणि पोलिसांमध्ये जोरदार वादावादीचा प्रकारही घडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
बस सेवा रोखून धरली
एसटी कर्मचाऱ्यांनी बस कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे एसटी बस स्थानकामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कर्मचाऱ्यांच्या प्रचंड घोषणाबाजीमुळे परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पहाटेपासून या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रवेशद्वारावर कर्मचाऱ्यांचा ठिय्या
एसटीचे विलीनीकरण राज्य शासनात व्हावे, यासह विविध मागण्यांसाठी पहाटेपासून सांगली घरातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. सकाळपासून बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर एसटी कर्मचारी हे ठिय्या मारून आंदोलन करत आहेत. त्यामुळे बस स्थानक परिसरात शुकशुकाट पसरला आहे. एसटी सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे त्यांनी खासगी प्रवासी वाहतुकीचा आधार घेतला आहे. कर्मचार्यांच्या संपामुळे सांगली जिल्ह्यातील एसटी सेवा कोलमडली आहे. तर संपाच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी अभावी शहरी, निमशहरी आणि लांब पल्ल्याच्या बस सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा - आमदार गोपीचंद पडळकर आणि शिवसेना-राष्ट्रवादी गटात राडा, पडळकरांच्या गाडीसह 3 गाड्यांचा तोडफोड...